सोलापूर, 26 एप्रिल: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. असं असताना राज्यातील बरेच राजकीय नेते आणि मंत्री पंढरपूर पोटनिवडणुकीला महत्त्व देताना दिसत आहेत. या निवडणुकीसाठी सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षातील नेतेही प्रचारसभा आणि बैठका घेण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे कोरोना काळात निवडणुकांना जास्त महत्त्व दिल्यानं महाराष्ट्रातील जनतेमध्ये राजकीय नेत्यांबाबत रोष निर्माण होतं आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणेही (Dattatray Bharne) सोलापूरकरांना वाऱ्यावर सोडून पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी प्रचार करताना दिसले आहेत.
गेल्या 22 दिवसांपासून ते आपल्या सोलापूरमधून गायब आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची उपचारासाठी वणवण वाढली आहे. अशी एकंदरित परिस्थिती असताना, उजनी धरणाचं पाणी इंदापूरला नेल्याचा आरोप दत्तात्रय भरणे यांच्यावर होतं आहे. दरम्यान रविवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी उजनी धरणाच्या पाणी प्रश्नावरून संताप व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी लांबलचक स्पष्टीकरण देताना, माध्यमांसमोर ओपन चॅलेंज केलं आहे. 'उजनीचं पाणी इंदापूरला नेल्याचं सिद्ध झालं, तर मी राजकीय संन्यास घेईन', अशा शब्दांत त्यांनी आरोपांच खंडन केलं आहे.
आढावा बैठक आणि पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यांनी पीपीई किट घालून कोविड वॉर्डाला भेट देखील दिली आहे. पण गेल्या 22 दिवसांपासून पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी गायब असलेल्या दत्तात्रय भरणे यांनी कोविड रुग्णालयाला भेट देल्यानं ही राजकीय स्टंटबाजी असल्याचा आरोपही त्यांच्यावर होतं आहे. गेल्या वर्षीय ऐन लॉकडाऊनच्या काळात त्यांनी पीपीई किट घालून कोविड रुग्णांची भेट घेतली होती. यावेळीही त्यांनी लोकांच्या मनातील रोष कमी करण्यासाठी कोविड रुग्णांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे.
हे ही वाचा- भाषण करताना तोंडावरून खाली सरकला मास्क, राज्यमंत्र्यांनी पुण्यात भरला 100 रुपये दंड
सध्या सोलापूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन बेडसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात ओढाताण होतं आहे. त्यामुळे वैद्यकीय सुविधा न मिळाल्यानं उपचाराअभावी सोलापूरमधील मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: NCP, Political leaders, Solapur