मुंबई, 26 जुलै : ‘शिवसेना कायद्याची व रस्त्यावरची लढाई जिंकेल. ज्यांनी विश्वासघात केलाय, पक्ष फोडलाय त्यांनी स्वतःच्या वडिलांचे फोटो लावून मते मागावीत. शिवसेनेच्या बापाचा फोटो लावून भीक मागू नका. शिवसेनेने तुम्हाला काय दिलं नाही?’ असा सवाल करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackery interview) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना थेट सवाल केला आहे.
शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे मोठी वाताहत झाली आहे. शिंदे गटाने बंडखोरी करून भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. या सगळ्या भूकंपानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीतून आपल्या रोखठोक बाजू मांडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना थेट सवाल केला आहे. त्या प्रश्नाचे उत्तर कुणीही बंडखोर आमदार देऊ शकणार नाही. आपल्या या महामुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिंदे आणि बंडखोरांवर जोरदार आसूड ओढला आहे.
'यांच्यावर आम्ही विश्वास टाकला त्यांनीच विश्वासघात केलाय. तेच आता आम्ही हिंदुत्व सोडलंय म्हणून आवई उठवताहेत, बोंब मारताहेत. त्यांना मला हाच प्रश्न विचारायचा आहे की, 2014 साली भाजपने युती तोडली होती, तेव्हा आपण काय सोडलं होतं? जेव्हा शिवसेना विरोधी पक्षात बसली होती तेव्हा अनेकांना असं वाटलं होतं की, शिवसेना आता संपेल. पण त्या वेळी शिवसेना एकाकी लढली आणि 63 आमदार निवडून आले. त्या काळात विरोधी पक्षाचीही जबाबदारी आपल्यावर आली होती, तेव्हा मी पद कुणाला दिलं होतं? असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.
दोन गोष्टी आहेत. समजा मी त्यांना त्या वेळेला मुख्यमंत्री केलं असतं. त्यांनी आणखी काहीतरी वेगळं केलं असतं. कारण त्यांची भूकच भागत नाही. त्यांना मुख्यमंत्रीपद पण पाहिजे आणि आता शिवसेनाप्रमुख व्हायचंय? शिवसेनाप्रमुखांबरोबर स्वतःची तुलना करायला लागलात? ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. याला हावरटपणा म्हणतात. म्हणजे दिलं तरी माझं ते माझं आणि तुझं तेही माझं, इथपर्यंत होतं. आता याचं तेही माझं आणि त्याचं तेही माझं. इथपर्यंत यांची हाव गेली आहे. या हावरटपणाला काही सीमा नसते, असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.
ज्यांचे आईवडील सुदैवाने त्यांच्यासोबत आहेत त्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या आशीर्वादाने काम करावे. माझे वडील का चोरताय? म्हणजेच काय तुमच्यामध्ये कर्तृत्व नाहीये, तुमच्यात हिंमत नाहीये. तुम्ही मर्द नाहीत. तुम्ही विश्वासघातकी आहात. आणि माझा तर विश्वासघात केलाच, लोकांचा विश्वासघात करताना बाळासाहेबांबद्दल संभ्रम निर्माण कशाला करताय? तुम्ही स्वतःला मर्द वगैरे समजता ना? तुमचा मर्दाचा चेहरा घ्या, जा पुढे आणि मागा मतं, असा थेट चॅलेंजच उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला दिलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.