उद्धव ठाकरे शपथविधी समारंभाला सहकुटुंब उपस्थित राहणार

उद्धव ठाकरे शपथविधी समारंभाला सहकुटुंब उपस्थित राहणार

NDAच्या बैठकीला आणि नंतर नरेंद्र मोदी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करतानाही उद्धव यांना मानाचं स्थान देण्यात आलं होतं.

  • Share this:

नवी दिल्ली 29 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी 30 मेला पंतप्रधानपदाची दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात हा दिमाखदार सोहळा होणार आहे.जगभरातले 6 हजार मान्यवर या समारंभाला उपस्थित राहतील. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे  हे या समारंभाला उपस्थित राहतील. युती झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि भाजपच्या नेत्यांचे संबंध अतिशय मधूर राहिले आहेत. या आधी उद्धव हे अमित शहा उमेदवारी अर्ज भरताना गांधीनगरला उपस्थित होते. त्यानंतर नरेंद्र मोदी वाराणसीमधून अर्ज भरतानाही ते उपस्थित होते. नंतर NDAच्या बैठकीला आणि नंतर नरेंद्र मोदी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करतानाही उद्धव यांना मानाचं स्थान देण्यात आलं होतं.

शिवसेनेला मंत्रिमंडळातला वाटा किती?

केंद्रीय मंत्रिमंडळ रचनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांची आजही बैठक झाली.  शिवसेनेला दोन कॅबिनेट मंत्रिपदं तर एक राज्यमंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

एनडीएला मिळालेल्या घवघवीत यशात शिवसेनेचाही मोठा वाटा आहे. त्यामुळेच मंत्रिपदासह लोकसभेचे उपसभापती पदही शिवसेनेला दिलं जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यातील बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

शिवसेनेकडून विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मुंबई अशा सर्व विभागांना प्रतिनिधित्व देण्यासाठी या भागातील खासदारांना मंत्रिपदाची संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये शिवसेनेच्या वतीने अनिल देसाई, विनायक राऊत, भावना गवळी यांची नावं आघाडीवर आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत जनतेनं पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या पारड्यात आपलं मत टाकलं. या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं. तर, NDAचं संख्याबळ हे 350च्या घरात गेलं. 30 मेरोजी नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळात कोण असणार? मित्र पक्षांना किती जागा असणार? यावर चर्चा सुरू झाली आहे. विशेषता जुना मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला 2014मध्ये अवघं एक मंत्रिपद मिळालं होतं. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात आणखी एक पद शिवसेनेला देण्यात येणार होतं. पण, मातोश्रीवरून गेलेल्या फोननंतर अनिल देसाई यांना विमानतळावरून माघारी परतावं लागलं होतं.

शिवसेनेनं वेळोवेळी आपली नाराजी उघड केली होती. राज्यात देखील दोन्ही पक्षांमध्ये सतत खटके उडत होते. पण, भाजपनं बदलत्या राजकीय स्थितीचा अंदाज घेत शिवसेनेशी जुळवून घेतलं. पण, NDA-2मध्ये शिवसेनेला किती मंत्रिपदं मिळणार हे पाहावं लागणार आहे.

First published: May 29, 2019, 5:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading