ठाणे, 26 जानेवारी : शिवसेनेमध्ये झालेल्या राजकीय भुकंपानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात आले होते, पण उद्धव ठाकरे यांचा दौरा संपून काही तास होत नाहीत तोच शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. ठाणे दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे आनंद दिघेंचं निवासस्थान आणि शक्तीस्थळावर गेले नाहीत. ठाकरे गटातील शिवसैनिकांना याबाबत विचारलं असता, जयंती उद्या आहे त्यामुळे आज जाणं योग्य नाही, असं उत्तर देण्यात आलं.
आनंदमठ आता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचं कार्यालय आहे, तर निदान उद्धव ठाकरे यांनी शक्तीस्थळावर जायला पाहिजे होतं, अशी चर्चा शिवसैनिकांमध्ये सुरू आहे. उद्धव ठाकरे ठाण्यात येऊनही आनंदमठ आणि शक्तीस्थळावर गेले नसल्यामुळे शिवसैनिक नाराज असून याविषयी ठाण्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
दरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आनंद मठात न गेल्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे. 'ते इथे आले नाही यावर आम्ही काय बोलणार? बाळासाहेबांनंतर जे नेतृत्व आलं त्यांचे पंख छाटण्याचं काम यांनी केलं. कधी त्यांची पुण्यतिथी दिसली नाही, जयंती दिसली नाही. गेली 10-12 वर्ष ते कधी आनंद मठात आलेले मला आठवत नाही,' असं नरेश म्हस्के म्हणाले.
'एकदा ठाणे मनपा निवडणूक होती तेव्हा ते आले होते तेव्हा निवडणूक होती म्हणून ते आले असतील. पोलीस बोलले होते उद्धव ठाकरे येणार होते, पण ते का आले नाहीत, याबाबत आम्हाला माहिती नाही. आमचं पक्ष कार्यालय आहे हे. आमच्याकडून विरोध का झाला असता?' असा सवाल नरेश म्हस्के यांनी विचारला आहे.
'आधी उद्धव ठाकरे जेव्हा यायचे तेव्हा जोरदार जल्लोष व्हायचा पण आज उद्धव ठाकरे जेव्हा ठाण्यात आले तेव्हाचे वातावरण पाहून खंत वाटली,' अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली.
खासदार राजन विचारे यांच्याकडून धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त आयोजित मोफत महा आरोग्य शिबीराचे उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते पार पडलं. उद्धव ठाकरे यांनी ठाणे दौऱ्यात एकनाथ शिंदेंवर टीका केली, तसंच ठाण्यात लवकरच विराट सभा घेणार असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंची तोफ ठाण्यात धडाडली, एकनाथ शिंदेंविरोधात सभेत जोरदार घोषणाबाजी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Thane, Uddhav Thackeray