मुंबई, 25 मार्च : अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विरोधकांवर जोरदार घणाघात केला. विविध मुद्द्यांवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप (BJP) आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) निशाणा साधला आहे.
तुमच्याकडे झोपेचं कुठलं औषध आहे?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आता सध्या जे काय सुरू आहे.... एक-एक गोष्ट बोलून मग सर्व गोष्टी केल्या जात आहेत. हर्षवर्धन पाटील जे आधी तुमच्याकडे होते त्यांना झोप लागत नव्हती. मग झोपेचं औषध घेतलं आणि तिकडे जाऊन ते झोपायला लागले. हा अनुभव त्यांनी कानात नाही सांगितला. तर एका सभेत सांगितला आहे. कधी कधी टीव्ही लावल्यावर जाहिराती येतात की, पहले मुझे निंद नही आती थी... तर असं काय तुमच्याकडे झोपेचं औषध आहे मला कळत नाही.
सत्तेचा प्रयत्न सफल झाला असता तर....
आम्ही सगळे भ्रष्टाचारी आहोत, दाऊदची माणसं आहोत मग सकाळच्या सत्तेचा प्रयत्न सफल झाला असता तर नवाब मलिक, अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून बसले नसते की नाही? आम्ही जर तुमच्या गळ्यात पट्टा बांधला असता तर आमच्या कुटुंबाची बदनामी करता... जी नीच आणि निंदनीय आहे. अत्यंत विृकृत अशी गोष्ट आहे.
मर्द असेल तर ये मर्दासारखा अंगावर, सत्ताचा दुरुपयोग करून समोर येतात. शिखंडीला लढण्याची ताकद नव्हती, त्यालामध्ये टाकलं. आता शिखंडी कोण आहे आणि मर्द कोण आहे, हेच कळत नाही. कोण कुणाच्या मागून लढत आहे. हिंमत असेल तर समोरासमोर या, नामर्दासारखे लढू नका. यंत्रणा वापरायच्या कुटुंबीयांना बदनाम करायचे, धाडी टाकायच्या हे काय आहे?
वाचा : 'सत्ता पाहिजे ना, मी येतो तुमच्या सोबत पण...' मुख्यमंत्र्यांची भाजपला थेट ऑफर
मागे नितीन गडकरी म्हणाले होते आमच्याकडे वाल्याचा वाल्मिकी होतो. जसं ईडीचं काम मनी लॉन्ड्रिंग आहे मग तसं तुमच्याकडे ह्युमन लॉन्ड्रिंगचं आहे का. बरबटलेला माणूस घ्यायचा आणि त्याला म्हैसूर सँन्डल सौप लावायचं आणि छान अत्तर लावून झाला बघा कसा सुंदर... हे ह्युमन लॉन्ड्रिंग तुम्ही सुरू केलं आहे का? असा सवालही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
हा महाराष्ट्र आहे. धृतराष्ट्र नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, हा महाराष्ट्र आहे. धृतराष्ट्र नाही. मी घाबरलो म्हणून बोलत नाही. यातून काहीच होणार नाही. ही संधी आहे, संधीचं सोनं करण्याचे काम आहे. काही सुचना असतील सांगा, कोण गुन्हेगार असेल तर सांगा आम्ही कारवाई करू. पण तुम्हाला सत्ता हवी आहे, म्हणून तुम्ही कुटुंबावर तणावात आणाचे, जामीन मिळू द्यायचा नाही, तुम्हाला सत्ता हवी आहे ना. चला सगळ्यासमोर सांगतो, मी तुमच्यासोबत आहे. उगाच पेनड्राईव्ह गोळा करू नका, पेन ड्राईव्हची गरज नाही. मी तुमच्यासोबत येतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Budget, Devendra Fadnavis, Maharashtra News, Uddhav thackeray