मुंबई, 22 नोव्हेंबर : महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेचा तिढा हळूहळू उलगडताना दिसतो आहे. काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन करणाऱ्या शिवसेनेनं अखेर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेच राज्याचं नेतृत्व सोपवण्याचं ठरवलं आहे. 'उद्धव ठाकरे यांनी राज्याचं नेतृत्त्व करावी, यावर आमचं एकमत झालं आहे. या निर्णयावर तिन्ही पक्षांनी सहमती दर्शवली आहे', अशी माहिती शरद पवार यांनी महाविकासआघाडीच्या बैठकीतून बाहेर पडता पडता दिली होती. पण उद्धव ठाकरे यांनी स्वतः मात्र याला दुजोरा दिला नव्हता. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झालं असलं, तरी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरत नव्हता. आता उद्धव ठाकरे यांचं नाव बैठकीत पुढे आल्यानंतर यांनी तत्त्वतः याला मान्यता दिल्याची माहिती पुढे येत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिल्याचं वृत्त आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी, उद्धव ठाकरेंनी सरकारचं नेतृत्त्व करावं यावर आमची सहमती झाली आहे, असं स्पष्ट केलं आहे. परंतु, उद्धव ठाकरे यांनी यावर अजून अधिकृत होकार कळवलेला नाही. मुंबईत नेहरू सेंटरची बैठक संपल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्यसह महापौर बंगल्यावर सेना नेत्यांबरोबरच्या बैठकीसाठी निघून गेले.
वाचा - महाविकासआघाडीची चर्चा अजूनही सुरूच; अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित
या बैठकीचा तपशील अजून बाहेर आलेला नाही, तरी संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारायला तयारी दर्शवली आहे.
वाचा - शिवसेनेचा पोपट होऊ नये म्हणजे झालं, प्रकाश आंबेडकरांचा टोला
राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आज मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये तिन्ही पक्षांच्या प्रमुखांची महत्त्वाची आणि निर्णायक बैठक पार पडली. या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी सेनेची भूमिका स्पष्ट केली.
वाचा - पाकिस्तानी Whatsapp ग्रुपमध्ये भारतीय सैन्याधिकारी, लष्कराने जारी केला अलर्ट
'आत्ता माझ्याकडे सांगण्यासारखं नाही. अजून चर्चा सुरू आहे. आम्ही असं ठरवलं आहे की एकही गोष्ट अनुत्तरीत ठेवायची नाही. अनेक मुद्द्यांवर वर एकमत झालं आहे. थोडे फार बारकावे बाकी आहेत. त्यावर चर्चा सुरू आहे. मला अर्धवट माहिती द्यायची नाही. म्हणून आत्ता बोलणार नाही. एकत्र पत्रकार परिषद घेऊन घोषणा करू', अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा