काँग्रेस नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य

काँग्रेस नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य

बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी संभाव्य आघाडीबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 13 नोव्हेंबर : मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून भाजपपासून फारकत घेतलेल्या शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत बोलणी सुरू केली आहे. त्यानंतर आज काँग्रेसच्या नेत्यांसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बैठकही झाली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी संभाव्य आघाडीबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. 'घाई करू नका. लवकरच निर्णय येईल. चर्चा योग्य दिशेने सुरू झाली आहे,' असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेना आणि काँग्रेसमध्ये झालेल्या आजच्या बैठकीत किमान समान कार्यक्रम काय राहील यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्यासह सुभाष देसाई, अशोक चव्हाण , बाळासाहेब थोरात आणि माणिकराव ठाकरे हे नेते उपस्थित होते. या बैठकीत शिवसेना आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर देखील चर्चा झाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या संभाव्य आघाडीच्या उभारणीसाठी हालाचालींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

'महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आहे. तीन पक्ष पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. त्यामुळे समान कृती कार्यक्रम आखण्यासाठी ठरावीक वेळ लागणारच. मात्र आम्ही महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ,' अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. शस्त्रक्रियेनंतर संजय राऊत यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सत्तावाटपावरून भाजपवर शिवसेनेकडून पहिली तोफ खासदार संजय राऊत यांनी डागली. त्यानंतर सातत्याने ते समसमान सत्तावाटपाच्या मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल करत राहिले. भाजपकडून मुख्यमंत्रिपद देण्यास नकार आल्यानंतर अखेर शिवसेनेनं त्यांच्यापासून दूर होण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतर ऐन मोक्याच्या क्षणी संजय राऊत यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता शस्त्रक्रियेनंतर संजय राऊत पुन्हा एकदा शिवसेनेच्या मिशन मुख्यमंत्रीसाठी मैदानात उतरण्यास सज्ज झाले आहेत.

शिवसेनेचा नेमका गेम कुणी केला? पडद्यामागे नेमकं काय घडतंय? पाहा SPECIAL REPORT

Published by: Akshay Shitole
First published: November 13, 2019, 2:59 PM IST

ताज्या बातम्या