विदर्भाची कावकाव करणाऱ्यांना ठोकूनच काढायला हवं-उद्धव ठाकरे

विदर्भाची कावकाव करणाऱ्यांना ठोकूनच काढायला हवं-उद्धव ठाकरे

'आवाज केला तर ठोकून काढू, बस खाली', असा आक्रमक इशारा जाहीर सभेमध्ये नितीन गडकरींनी गोंधळी विदर्भवादी कार्यकर्त्यांना दिला होता.

  • Share this:

मुंबई, 8 मार्च : विदर्भाच्या विकासाचा झपाटा पाहता स्वतंत्र विदर्भ मागण्याची गरजच राहिली नाही, अशी भूमिका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने मांडली आहे. त्यांच्या या भूमिकेचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून कौतुक केले आहे.

बुधवारी (6 मार्च)नागपुरात नितीन गडकरी यांची जाहीर सभा होती. या सभेदरम्यान 'स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे, जय विदर्भ' अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांकडून सुरू होती. या गोंधळी कार्यकर्त्यांना गडकरींनी फैलावर घेत 'आवाज केला तर ठोकून काढू, बसा खाली', असा आक्रमक इशारा दिला.

गडकरींच्या या भूमिकेचे सामना संपादकीयमधून जाहीर कौतुक करण्यात आले आहे.

''गडचिरोलीपासून नागपूरपर्यंत आणि बुलढाणा, यवतमाळपासून अमरावतीपर्यंत सगळीकडे विकासाची घोडदौड सुरू असताना वेगळ्या विदर्भाची कावकाव कोणी करीत असेल तर गडकरी म्हणतात त्याप्रमाणे त्यांना ठोकूनच काढायला हवे. विदर्भाच्या विकासाचा हा झपाटा पाहता स्वतंत्र विदर्भ मागण्याची गरजच राहिली नाही, अशी भूमिका गडकरींनी आता मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने मांडली आहे. या बदलाचे स्वागत करून अखंड महाराष्ट्राने नितीन गडकरींचे जाहीर अभिनंदन केलेच पाहिजे!'', अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी गडकरींच्या भूमिकेचं कौतुक केले आहे.

नेमके काय म्हणाले होते गडकरी ऐका

VIDEO: स्वतंत्र विदर्भाच्या घोषणा देणाऱ्यांना ठोकून काढा - नितीन गडकरी

काय आहे आजचे सामना संपादकीय?

नितीन गडकरी यांचे आम्ही खास अभिनंदन करीत आहोत. स्वतंत्र विदर्भ मागण्याची गरज नाही. विकास व्हावा म्हणून स्वतंत्र विदर्भाची मागणी होती. आता विकासाचा वेग वाढला आहे. त्यामुळे वेगळा विदर्भ मागणे बरोबर नसल्याचे गडकरी यांनी ठणकावून सांगितले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या साक्षीने त्यांनी हे सांगितले. एका जाहीर कार्यक्रमात गडकरींचे भाषण सुरू असताना काही विदर्भवादी पोरांनी गोंधळ घातला. गडकरी यांचे भाषण बंद पाडण्याचा प्रयत्न केला. स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारे शांत होत नाहीत हे पाहून गडकरी यांनी ‘यांना बाहेर नेऊन ठोकून काढा,’ असे पोलिसांना सांगितले व त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनीही स्वतंत्र विदर्भवादी पोरांना ठोकून काढले. हे सर्व मुख्यमंत्र्यांच्या समोर घडले. ही ठोकाठोक महाराष्ट्रहिताचीच असल्याने ठोकाठोकीमुळे कायदा-सुव्यवस्थेलाही ठोकले काय, असले प्रश्न निरर्थक आहेत. विकास हाच राज्यकारभाराचा पाया असतो. त्या विकासाला विदर्भात चांगलीच गती मिळाली आहे. त्यामुळे गेल्या 40-50 वर्षांचा जो काही ‘बॅकलॉग’ होता तो चार वर्षांत भरून निघाला आहे. दोन दिवसांपूर्वीच नागपुरात ‘मेट्रो’ची रंगीत तालीम झाली. रस्ते, उद्योग, शिक्षण यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी विदर्भात विशेष लक्ष घातले. अनेक कार्यक्षम अधिकारी त्यांनी विदर्भाच्या कार्यासाठी नेमले. बजेटमध्ये विदर्भासाठी विशेष तरतूद करून विकासाच्या अनेक प्रकल्पांना गती दिली हे सत्य नाकारता येणार नाही.

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून विदर्भावर सातत्याने अन्याय होत राहिला ही भावना बळावली गेली. शिवसेना-भाजप युतीची एक राजवट सोडली तर आजवरच्या सर्वच सरकारांनी विदर्भाला विकासापासून वंचित ठेवले. रखडलेल्या विकासाचा विदर्भातील त्या-त्या वेळी अडगळीत पडलेल्या नेत्यांनी कायमच राजकीय हत्यारासारखा वापर केला आणि त्यांनीच वेगळ्या विदर्भाचा किडा अधूनमधून वळवळत ठेवला. पण एक मात्र निश्चित की, स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला व्यापक जनसमर्थन कधीच मिळाले नाही. तसे असते तर संयुक्त महाराष्ट्राचा नारा बुलंद करणाऱ्या शिवसेनेचे चार-चार खासदार वैदर्भीय जनतेने कधीच निवडून दिले नसते. वेगळ्या विदर्भाची टूम मूठभर नेत्यांची होती हे अनेकदा सिद्ध झाले. एकाच मराठी भाषिक राज्याची शकले उडविण्यास विदर्भातील जनतेने पाठिंबा दिला नसला तरी विकासापासून विदर्भाला दूर ठेवले जात आहे, ही भावना मात्र तेथील जनतेच्या मनात नक्कीच निर्माण झाली होती. ती रास्तही होती. शिवसेनाही सातत्याने हेच सांगत राहिली. वाटेल तेवढा निधी खर्च करून विदर्भाचा सर्वांगीण विकास करा, पण अखंड महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा विचारही करू नका हीच भूमिका शिवसेना हिरिरीने मांडत राहिली. गेल्या साडेचार वर्षांत विदर्भात नेमका हाच बदल झाला. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी केंद्राच्या तिजोरीतून तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या तिजोरीतून मुक्तहस्ताने निधी खर्च करून कधीही न पाहिलेली विकासाची गंगा विदर्भात आणली.

राज्य सरकार समृद्धी महामार्गासारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवीत असतानाच नितीन गडकरी यांनीदेखील 80 हजार कोटी रुपयांचा निधी विदर्भाला देऊ केला. नागपुरातील 8 हजार कोटी रुपये खर्चाच्या मेट्रोचे काम पूर्णत्वास आले आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ, जागतिक दर्जाचे रेल्वे स्थानक, आयआयएम, ट्रिपल आयटी, मिहानमध्ये हवाई क्षेत्रातील दहा कंपन्यांचा सहभाग, पर्यटनाला चालना मिळावी यासाठी गोरेवाडा येथे आंतरराष्ट्रीय स्तराचे प्राणिसंग्रहालय अशी असंख्य विकासकामे आणि पायाभूत सुविधांचे प्रकल्प यामुळे विदर्भाचे रूपच गेल्या चार वर्षांत पालटले आहे. जिकडे-तिकडे सिमेंटचे गुळगुळीत रस्ते, विदर्भातील सर्व 11 जिह्यांतून नागपूरला येणाऱ्या रस्त्यांचे चौपदरीकरण अशी कामे होत असताना वेगळ्या विदर्भाची गरजच काय, अशी भूमिका गडकरींनी मांडली असेल तर तिचे स्वागतच व्हायला हवे. 1985 पासून रखडलेल्या हजारो कोटींच्या गोसी खुर्द सिंचन प्रकल्पाचे काम वर्षभरात पूर्ण होत आहे. पूर्व विदर्भातील 11 जिह्यांतील शेती या प्रकल्पामुळे ओलिताखाली येणार आहे. विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱयांसाठी रेडिमेड गारमेंट झोन अशी एक ना अनेक विकासकामे विदर्भात आकाराला येत आहेत. गडचिरोलीपासून नागपूरपर्यंत आणि बुलढाणा, यवतमाळपासून अमरावतीपर्यंत सगळीकडे विकासाची घोडदौड सुरू असताना वेगळ्या विदर्भाची कावकाव कोणी करीत असेल तर गडकरी म्हणतात त्याप्रमाणे त्यांना ठोकूनच काढायला हवे. विदर्भाच्या विकासाचा हा झपाटा पाहता स्वतंत्र विदर्भ मागण्याची गरजच राहिली नाही, अशी भूमिका गडकरींनी आता मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने मांडली आहे. या बदलाचे स्वागत करून अखंड महाराष्ट्राने नितीन गडकरींचे जाहीर अभिनंदन केलेच पाहिजे!

First published: March 8, 2019, 6:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading