पोहरादेवीची गर्दी पाहून मुख्यमंत्री संतापले; म्हणाले...

पोहरादेवीची गर्दी पाहून मुख्यमंत्री संतापले; म्हणाले...

गेल्या 15 दिवसांपासून प्रसारमाध्यमांपासून दूर असलेले वनमंत्री संजय राठोड पोहोरादेवी मंदिरात दर्शनाच्या निमित्ताने समोर आले होते.

  • Share this:

मुंबई, 23 फेब्रुवारी : वाशीम जिल्ह्यातल्या पोहरादेवी इथे आज सकाळपासून झालेल्या गर्दीबाबत माध्यमांत येत असलेल्या बातम्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. स्वतःच्याच मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्यांनी तिथे उपस्थिती लावली होती. तरीही मुख्यमंत्री ठाकरे यांनी याबाबत कडक धोरण अवलंबलं आहे. 'कोविडसंदर्भात आरोग्याचे नियम सर्वाना सारखेच', असं म्हणत गर्दीबाबत प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत.

गेल्या 15 दिवसांपासून प्रसारमाध्यमांपासून दूर असलेले वनमंत्री संजय राठोड पोहोरादेवी मंदिरात दर्शनाच्या निमित्ताने समोर आले. पहिल्यांदाच त्यांनी पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी आपली बाजू कॅमेऱ्यासमोर मांडली. राठोड येणार हे माहिती असल्याने तिथे सकाळपासूनच कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी जमलेली होती.

कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी असे आदेश आता मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. वाशीम जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना या प्रकराचा अहवाल देण्यास सांगण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत.

VIDEO: संजय राठोड पोहरादेवीत दाखल होताच समर्थक आक्रमक; पोलिसांचा लाठीचार्ज

आज राज्यातही कोविड परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वर्षा इथे एका बैठकीत आढावा घेतला तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिका आयुक्तांशी देखील संसर्ग रोखण्यासंदर्भात करीत असलेल्या उपाय योजनांबाबत मार्गदर्शन केले.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, गेले वर्षभर आपण अतिशय संयमाने आणि निर्धाराने कोविडची लढाई लढत आहोत. आपले अनेक आरोग्य कर्मचारी, पोलीस तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी जीवावर उदार होऊन हा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे या संपूर्ण काळात सर्व महत्वाचे धार्मिक सण आणि उत्सव नागरिकांनी शांततेत आणि शासनाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे पार पाडले. या काळात मोठमोठी धार्मिक स्थळे देखील नियमांचे पालन करीत होती आणि आता देखील मिशन बिगिन अगेनमध्ये या कार्यपद्धतीचे पालन करणे आपली जबाबदारी आहे.

मी परवाच माझ्या सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही हे याचसाठी सांगितले कारण कोरोनाची दुसरी लाट येणे आपल्या सगळ्यांसाठी काळजीचा विषय आहे. शासन म्हणून आम्ही तयारच आहोत पण नागरिक म्हणून प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी पण आहे हे सर्वानी लक्षात ठेवावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

First published: February 23, 2021, 7:11 PM IST

ताज्या बातम्या