बाळासाहेब थोरातांची डोकेदुखी वाढली, पक्षांतर्गत संघर्ष टोकाला पोहोचल्याने राजकीय कोंडी

काँग्रेस पक्षात दोन माजी मुख्यमंत्र्यांना कोणतं कॅबिनेटचे खातं द्यायचं यावरून अंतर्गत संघर्ष पेटला आहे.

  • Share this:

सागर कुलकर्णी, मुंबई, 20 डिसेंबर : राज्यातील महाविकास आघाडीतील राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरून काँग्रेस पक्षात मोठा पेच तयार झाला आहे. काँग्रेस पक्षात दोन माजी मुख्यमंत्र्यांना कोणतं कॅबिनेटचे खातं द्यायचं यावरून अंतर्गत संघर्ष पेटला आहे. काँग्रेस पक्षाच्या वाट्याला 12 मंत्रिपदं आली आहेत. मात्र या मंत्रिपदांसाठी काँग्रेसमध्ये मोठी स्पर्धा सुरू असल्याचं दिसत आहे.

मंत्रिपदाच्या स्पर्धेतून काँग्रेस पक्षातील नेते दिल्ली हायकमांडकडे लॉबिंग तर करतच आहेत, पण त्याचवेळी आपला प्रतिस्पर्ध्याचा पत्ता कसा कट होईल, याची खबरदारी देखील घेत आहेत. नेमकं हेच कारण काँग्रेसच्या दिल्लीतील नेतृत्वासाठी तसंच राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासाठीही डोकेदुखी ठरत आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचं कोणाला मंत्री करायचं हे जवळपास निश्चित झालं आहे. मात्र बाळासाहेब थोरात यांच्यानंतर महत्त्वाच्या पदासाठी पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी दिल्लीत लॉबिंग सुरू केल्याची जोरदार चर्चा आहे. 28 नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्क इथं ठाकरे सरकारचा शपथविधी झाला. यात काँग्रेस पक्षाकडून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि दलित चेहरा म्हणून विदर्भात नागपूर येथून नितीन राऊत यांना कॅबिनेटपदाची शपथ दिली.

अजित पवारांचा भाजपला पहिला धक्का, सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण हे दोन माजी मुख्यमंत्री मंत्रिमंडळात सुरुवातीला स्थान मिळेल या आशेवर होते. मात्र त्यांच्या पदरी निराशा आली. तसंच अशोक चव्हाण गटाचे अशी ओळख असलेले विजय वडेट्टीवार यांच्याऐवजी विदर्भातून राऊत यांना संधी मिळाली. त्यामुळे चव्हाण अधिकच नाराज झाले. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये किमान कॅबिनेट मंत्रिपद तसंच महत्त्वाचं खत मिळावं यासाठी चव्हाण गट दिल्लीत सक्रिय झाला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारात बाळासाहेब थोरात यांना अधिक महत्व मिळाल्याने काँग्रेसअंतर्गत अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात असा कलह वाढल्याची चर्चा आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा राज्यात लागू करू नये अशा स्वरूपाची आग्रही भूमिका मांडत अशोक चव्हाण यांनी थोरात यांची अप्रत्यक्षरीत्या राजकीय कोंडी केल्याचं बोललं जातं आहे. कारण थोरात हे या प्रश्नावरून थेट आक्रमक भूमिका घेत नसतानाच चव्हाण यांनी अशी भूमिका घेत थोरातांची कोंडी केल्याचं बोललं जात आहे.

कोणत्या भागातून कुठल्या नेत्यांमध्ये आहे स्पर्धा?

काँग्रेसमधील दोन्ही माजी मुख्यमंत्री महसूलपदाची स्वप्न पाहत असतानाच थोरात यांना दिल्ली हायकमांडने महसूलसह महत्त्वाची खाती दिली आहेत. मंत्रिपदासाठी काँग्रेसमधून विदर्भातील विजय वडेट्टीवार, सुनील केदार, माणिकराव ठाकरे आणि यशोमती ठाकूर या नेत्यांमध्ये चुरस आहे.

सर्वपक्षीय आमदारांच्या फोटोसेशनला फडणवीस आलेच नाहीत! दिलं 'हे' कारण

मराठवाड्यात अमित देशमुख यांना कॅबिनेट मंत्रिपद जवळपास निश्चित झालं आहे . दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात मात्र काँग्रेस पक्षात मंत्रिपदासाठी जास्त स्पर्धा दिसून येते. सांगलीतून विश्वजीत कदम, कोल्हापूरमधून माजी राज्यमंत्री सतेज पाटील, पुणे जिल्ह्यातून संग्राम थोपटे तर सातारा जिल्ह्यातून पृथ्वीराज चव्हाण यांच्यात मंत्रिपदासाठी जोरदार स्पर्धा आहे.

नितीन राऊत यांना दलित चेहरा म्हणून यापूर्वीच संधी मिळाली आहे. आता महिला आणि दलित या कोट्यातून संधी मिळावी यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे स्वतःच्या मुलगी प्रणिती शिंदे, तर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष स्वतःची मुलगी वर्षा गायकवाड यासाठी दिल्लीमध्ये प्रयत्न करत आहेत. मुस्लिम चेहरा म्हणून काँग्रेस पक्षातून मुंबईतून अमीन पटेल आणि नसीम खान हे प्रयत्न करत असून यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झाला आहे.

दरम्यान, काँग्रेस पक्षातील तरुण आमदार महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी अधिक आग्रही होत., त्यामुळे विचारांची चौकट बाजूला ठेवत दिल्ली हायकमांडला राज्यात महाविकास आघाडीमध्ये थेट सहभागी व्हावे लागले होते. आता मंत्रिपदाची संधी मिळावी यासाठी जुने आणि नवीन आमदारही प्रयत्न करत आहेत. त्यामुळे नक्की कुणाला संधी द्यायची, याबाबत काँग्रेस नेतृत्वामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 20, 2019 12:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading