उद्धव ठाकरे सरकारमध्ये पुन्हा कारखानदारांची चलती; 36 पैकी 16 मंत्री आहेत साखर सम्राट

उद्धव ठाकरे सरकारमध्ये पुन्हा कारखानदारांची चलती; 36 पैकी 16 मंत्री आहेत साखर सम्राट

ठाकरे सरकारमधले बहुतेक मंत्री पश्चिम महाराष्ट्रातल्या समृद्ध पट्ट्यातले असल्याची टीका होत आहे. त्यातच आता 36 मधले 16 मंत्री साखर सम्राट असल्याचं उघड झालं आहे.

  • Share this:

मुंबई, 31 डिसेंबर : महाराष्ट्रात बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आता नव्या मंत्रिमंडळाच्या स्वरूपाविषयीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ठाकरे सरकारमधले बहुतेक मंत्री पश्चिम महाराष्ट्रातल्या समृद्ध पट्ट्यातले असल्याची टीका होत आहे. त्यातच आता 36 मधले 16 मंत्री साखर सम्राट असल्याचं उघड झालं आहे. पश्चिम महाराष्ट्रातले काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बहुतेक आमदार सुस्थापित कारखानदार असलेले साखर सम्राट आहेत. पाच वर्षांनंतर या साखर सम्राटांची मंत्रिमंडळात पुन्हा एकदा वर्णी लागली आहे.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, 36 पैकी 16 मंत्र्यांचा साखर कारखान्यांशी थेट संबंध आहे. ते स्वतः किंवा परिवारातलं कुणीतरी सहकारी साखर कारखान्यांच्या संचालक मंडळावर आहे. देवेंद्र फडणवीस सरकारमध्येही साखर सम्राट होते. पण तुलनेनं त्यांची संख्या कमी होती. ती आता चौपट झाली आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातले सर्वाधिक 8 मंत्री साखर उद्योगाशी संबंधित आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील अशा मोठ्या नावांचा समावेश आहे.

काँग्रेसच्या कोट्यातल्या मंत्र्यांमध्येही मोठ्या संख्येने साखर उद्योगातले आमदार आहेत. अशोक चव्हाण, अमित देशमुख, बाळासाहेब थोरात आणि अपक्ष असणारे शंकरराव गडक आणि राजेंद्र पाटील हे साखर उद्योगाशी संबंधित आहेत. महाराष्ट्रात साखर कारखानदारांचं राजकारण हा विषय नवा नाही. अनेक वर्षं सहकारी साखर कारखान्यांमधूनच महाराष्ट्राला नेतृत्व मिळालं आहे.

महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे राज्यच नाही, तर देशाचं लक्ष होतं. भाजपला शह देण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी अनैसर्गिक युती करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचं स्थैर्य या मंत्रिमंडळ विस्तारानंतरही कायम राहणार का, असे प्रश्न विचारण्यात येत होते. कर्नाटकात काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्तेत आलेलं कुमारस्वामी सरकार पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतरच कोसळलं होतं.

आता कुठल्या पक्षात किती नाराज यापेक्षा किती ताकदीचे नेते नाराज यावरून सरकारचं स्थैर्य ढळणार की राहणार हे समजू शकेल.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 31, 2019 05:01 PM IST

ताज्या बातम्या