मुंबई, 23 जानेवारी : वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाच्या युतीची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. अखेर आज संयुक्त पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी युती झाल्याचं जाहीर केलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. ही युती विजयी दिसणार आहे. हिंमत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा. मग जागा वाटप कसं करायचं ते आम्ही पाहू, तो आमचा प्रश्न आहे. माझं गद्दारांना आणि गद्दारांच्या बापजाद्यांना आव्हान आहे की, निवडणूक घेऊन दाखवाच, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला केलं आहे.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
जेव्हा आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आलो, तेव्हाही आमच्यावर अनेक आरोप झाले. पण आम्ही सगळ्या आरोपांना उत्तरं दिली. आम्ही अडीच वर्ष सरकार चालवून दाखवले. आज देश प्रथम हा शब्द वापराला जात आहे. यातून देशात एकप्रकारचा भ्रम पसरवला जात आहे. लोकांना भ्रमात ठेवून हुकुमशाही लादली जात आहे. त्याच वैचारिक प्रदुषणातून लोकांना मोकळं करण्यासाठी, लोकशाहीसाठी आम्ही एकत्र आलो आहेत, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.
भाजपवर निशाणा
पुढची राजकीय वाटचाल कशी असेल, पुढे काय करायचं आहे? हे त्या त्या वेळी आम्ही एकत्र येऊन निर्णय घेऊ. पण तळागाळातील जनता आहे त्यांच्यापर्यंत देशात काय चाललं आहे, हे पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत. मागे पंतप्रधान मोदी आले होते. त्यांच्या सभेला कुठून लोक आली होती हे सर्वांनी पाहिलं. फक्त निवडणुकांसाठी लोकांच्या पुढे जायचं आणि मतदान झाल्यावर यांची उड्डाण सुरूच असतात असं म्हणत त्यांनी यावेळी भाजपला देखील टोला लगावला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.