अशोक चव्हाणांची मंत्रिमंडळात एण्ट्री होणार, 'हे' खातं मिळण्याची शक्यता

अशोक चव्हाणांची मंत्रिमंडळात एण्ट्री होणार, 'हे' खातं मिळण्याची शक्यता

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे.

  • Share this:

मुंबई, 24 डिसेंबर : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येऊन जवळपास एक महिना होत आला तरीही अद्याप मंत्रिमंडळ विस्ताराचा पेच कायम आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येईल असं शिवसेनेकडून सांगितलं जात होतं. मात्र हा विस्तार नेमका कधी होणार याबाबत अद्यापही ठोस निर्णय झाला नसल्यानं आमदारांच्या मनातही काहीसा संभ्रम आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तारात काही ज्येष्ठ नेत्यांचा समावेश होणार असल्याचं नक्की झालं आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे.

अशोक चव्हाण हे काँग्रेसचे निष्ठावान आणि दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यावरच चव्हाण यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र तेव्हा काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे दोनही माझी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांना वेटिंगवर थांबावं लागलं.

मात्र आता मंत्रिमंडळ विस्तारात अशोक चव्हाण यांची वर्णी लागणार हे निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अशोक चव्हाण यांनी याआधी राज्याचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. त्यामुळे त्यांना सन्मानजनक खातं देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांना ऊर्जा किंवा सार्वजनिक बांधकाम खातं दिलं जाण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण? स्पर्धेत 3 नेते आघाडीवर

दरम्यान, काँग्रेसमुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली. या भेटीत शिवसेना आणि राष्ट्रवादीची विस्ताराची सगळी चर्चा पूर्ण झाली असून नावंही फायनल झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र काँग्रेसचा निर्णय अजुनही झालेला नाही. काँग्रेसची यादी न आल्यामुळे हा विस्तार लांबणीवर पडल्याची चर्चा आहे.

काँग्रेसमधून कोणाला मंत्रिपद द्यायची याची अंतिम यादी ठरवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह काही नेते दिल्लीत दाखल झाले आहे. दिल्लीत काँग्रेसची यादी या दोन दिवसांत फायनल झाल्यास मंत्रिमंडळ विस्तार महिन्या अखेरीस केल्या जाण्याचा अंदाजही व्यक्त केला आहे. तर काँग्रेसनं निर्णय घेतला नाही तर कदाचित हा विस्तार नव्या वर्षाच्या सुरुवातीला केला जाईल असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. काँग्रेसकडून फारच उशीर होत असेल तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना शपथ दिली जाऊ शकते असेही काही नेत्यांचे म्हणणे आहे.

जयंत पाटलांनी पुन्हा घेतली भाजपची फिरकी, मंत्रिमंडळ विस्ताराबद्दलही केलं भाष्य

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रत्येकी दोन जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. बहुमत सिध्द करणं आणि हिवाळी अधिवेशन चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी विस्तार थांबविण्यात आला होता. विस्तारात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो अजित पवारांच्या समावेशाचा. त्यांना उपमुख्यमंत्रिपद दिलं जाणार का? याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. त्यांना उपमुख्यमंत्रिपद मिळालं नाही तर राष्ट्रवादीत नाराजी उफाळून येवू शकते अशीही शक्यता व्यक्त केली जातेय.

Published by: Akshay Shitole
First published: December 24, 2019, 5:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading