मुंबई, 12 डिसेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त शरद पवारांवर फक्त राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्तेच नाही तर इतर पक्षांचे नेतेही शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये पवारांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित केले, तसंच मुंबईत सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
शरद पवारांच्या वाढदिवशी मुंबईमध्येही संध्याकाळी घडामोडींना वेग आला. शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सिल्व्हर ओकवर आले होते. उद्धव ठाकरे यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर, सचिन अहिर आणि जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते. शरद पवार यांचा आज 82 वा वाढदिवस आहे.
शरद पवार हे राज्यातल्या महाविकासआघाडीचे जनक समजले जातात. 2019 साली भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळालं, पण शिवसेनेने भाजपसोबत न जाता काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन महाविकासआघाडीची स्थापना केली, यानंतर उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. शरद पवारांनी आग्रह केल्यामुळे आपण मुख्यमंत्री झाल्याचं उद्धव ठाकरेंनी अनेकवेळा जाहीर कार्यक्रमांमधून सांगितलं.
शरद पवारांनी केलेला हा महाविकासआघाडीचा प्रयोग राज्यात यशस्वी झाला नाही, कारण एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसह बंड केलं, ज्यामुळे महाविकासआघाडी सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी त्यांच्या या बंडाला राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरलं. एकनाथ शिंदे यांच्या या बंडानंतरही महाविकासआघाडी एकत्र दिसत आहे. 17 डिसेंबरला मुंबईमध्ये महाविकासआघाडी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात मोर्चा काढणार आहे.
'हे कितपत शहाणपणाचं', शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना सल्लावजा टोला
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन कार्यक्रमात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालच झालेल्या महाराष्ट्र दौऱ्यावरून टोला लगावला, तसंच चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याचाही समाचार घेतला.
मंत्री काय फक्त तुम्हीच झाला का? शरद पवारांनी चंद्रकांत पाटलांना फटकारलं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.