गडकिल्ले लग्नासाठी भाड्यानं देण्यात चुकीचं काय? उदयनराजेंनी सरकारच्या धोरणाचं केलं समर्थन

गडकिल्ले लग्नासाठी भाड्यानं देण्यात चुकीचं काय? उदयनराजेंनी सरकारच्या धोरणाचं केलं समर्थन

राज्यातील गडकिल्ले भाड्यानं देण्याच्या सरकारच्या धोरणावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. यावर आता उदयनराजेंनी सरकारचं समर्थन केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 15 ऑक्टोबर : छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांना हॉटेल आणि लग्नसमारंभासाठी भाड्यानं देण्याच्या प्रकरणावरून राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. त्यानंतर पर्यटन मंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं होतं. यामध्ये कोणत्या प्रकारचे किल्ले आणि का भाड्याने दिले जातील हे सांगितलं होतं. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज आणि भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी किल्ले भाड्यानं देण्याच्या धोरणाचं समर्थन केलं आहे.

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत उदयनराजेंना गडकिल्ले भाड्यानं देण्याच्या राज्यसरकारच्या निर्णयाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उदयनराजे म्हणाले की, गडकिल्ले भाड्यानं देण्याचा सरकारच्या धोरणाला माध्यमांनी चुकीच्या पद्धतीनं मांडलं. पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सरकारच्या धोरणाबद्दल माहिती दिली. सरकारच्या धोरणात किल्ल्याचा काही भाग लग्न समारंभासाठी भाड्याने देण्याबाबतचा उल्लेख आहे. मला तरी यात काहीही चुकीचं वाटत नाही. आपण मंदिरांमध्ये लग्न लावत नाही का? असा प्रश्न उदयनराजेंनी विचारला आहे. देशाची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून असते. गडकिल्ले भाड्यानं दिल्यास देशाची अर्थव्यवस्था सुधारेल असंही उदयनराजे म्हणाले.

ज्यावेळी हा मुद्दा समोर आला होता त्यावेळी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये कोणत्या प्रकारचे किल्ले पर्यटन विकासासाठी ऐतिहासिक स्थळं म्हणून विकास करण्यात येणार आहेत याची माहिती दिली आहे. यात त्यांनी सांगितलं होतं की,राज्यात दोन प्रकारचे किल्ले आहेत. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित आणि अन्य ऐतिहासिक संदर्भ असलेले किल्ले हे वर्ग एक मध्ये येतात आणि इतर सुमारे 300 किल्ले हे वर्ग दोन मध्ये येतात.

पोस्टमध्ये पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना हात लावणार नाही असं स्पष्ट केलं होतं. रावल म्हणाले की, राज्यातील किल्ल्यांचं हेरिटेज हॉटेल करण्यात येणार ही अफवा आहे. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांबद्दल कोणताही निर्णय सरकारनं घेतलेला नाही. किल्ल्यावर लग्न किंवा इतर कार्यक्रम असं काही होणार नाही.

VIDEO : भाजप पुन्हा सत्तेत आल्यास तुम्हाला काय मिळणार? जाणून घ्या 1 मिनिटात संकल्पपत्रातील मुद्दे

First published: October 15, 2019, 3:22 PM IST
Tags: udayanraje

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading