सस्पेन्स वाढला! शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर उदयनराजेंच्या मनात नेमकं चाललंय काय?

सस्पेन्स वाढला! शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर उदयनराजेंच्या मनात नेमकं चाललंय काय?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उदयनराजे यांच्यात पुण्यामध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे.

  • Share this:

सागर कुलकर्णी, 12 सप्टेंबर : सततच्या आऊटगोईंगमुळे विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याही भाजप प्रवेशाची चर्चा रंगत आहे. त्यामुळे डॅमेज कण्ट्रोल करण्यासाठी राष्ट्रवादीकडून उदयनराजेंची समजूत काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उदयनराजे यांच्यात पुण्यामध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे.

भाजपच्या तिसऱ्या मेगाभरतीमध्ये उदयनराजे हाती कमळ घेतील, असं बोललं जात होतं. मात्र त्यांच्या काही मागण्या भाजपकडून मान्य न झाल्याने हा प्रवेश बारगळल्याची चर्चा आहे. त्यानंतर पुन्हा उदयनराजेंनी भाजप प्रवेशासाठी हालचाली करू नयते, यासाठी खुद्द शरद पवार सरसावल्याचं पाहायला मिळालं. शरद पवार आणि उदयनराजेंच्या पुण्यातील बैठकीवेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि साताऱ्यातील राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते.

राष्ट्रवादीकडून उदयनराजेंना रोखण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र शरद पवारांसोबतच्या आजच्या बैठकीनंतर उदयनराजेंनी आपली भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे उदयनराजेंच्या मनात नेमकं काय चाललंय, हे मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे आगामी काळात उदयनराजे नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

उदयनराजेंचा भाजप प्रवेश का थांबला?

उदयनराजेंसारख्या दिग्गज नेत्यालाही याआधी निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. त्यामुळे स्वत:च्या करिष्म्यासोबत पक्षाची संघटनात्मक ताकद मागे उभी असणं उदयनराजेंसाठी गरजेचं असल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे. भाजप प्रवेशाबाबत विचारमंथन करण्यासाठी बोलवलेल्या बैठकीतही उदयनराजेंनी आपल्या कार्यकर्त्यांना आव्हानांची जाणीव करून दिली होती. 'या निवडणुकीत माझं मताधिक्य घटलं आहे. एकप्रकारे हा पराभवच आहे. त्यामुळे पुढचा निर्णय घेताना घाई नको,' असंही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादी सोडणं उदयनराजेंसाठी तितकंच सोपं नसल्याचं दिसत आहे.

दरम्यान, सगळ्या आव्हानांचा सामना करत उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडत जर भाजप प्रवेशाचा निर्णय घेतलाच तर त्यांना आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे राजेंना पुन्हा लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा सामना करावा लागेल. तेव्हा राष्ट्रवादीकडून उदयनराजेंसमोर कडवं आव्हान निर्माण केलं जाण्याची शक्यता आहे. कारण 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळीही सातारा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील आणि अन्य काही नावं चर्चेत होती. त्यामुळे उदयनराजेंनी पक्ष सोडल्यास राष्ट्रवादी दुसऱ्या नेत्यांना ताकद देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

VIDEO : दादर स्थानकावर काय घडलं? सुप्रिया सुळेंनी सांगितला धक्कादायक अनुभव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2019 06:09 PM IST

ताज्या बातम्या