'....तर महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल', उदयनराजे आक्रमक

माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 2, 2019 09:39 AM IST

'....तर महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल', उदयनराजे आक्रमक

मुंबई, 2 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आठवडा उलटून गेल्यानंतरही भाजप आणि शिवसेनेत सत्ता वाटपावरून एकमत होऊ शकलेलं नाही. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं असताना राज्यातील राजकीय पक्ष मात्र सत्तासंघर्षात व्यस्त आहेत. त्यामुळे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

'कोलमडलेल्‍या शेतकरी बळीराजाला शासनाने योग्‍य ती मदत देवून धीर द्यावा असे निवेदन राज्‍याचे महामहीम राज्‍यपाल आणि मुख्यमंत्री तसंच मुख्य सचिव यांना देण्यात आले आहे. मागण्याची पूर्तता झाली नाही तर, शेतकऱ्यांच्या असंतोषामुळे कायदा-सुव्यवस्‍थेचा प्रश्न निर्माण होईल. बळीराजा आमच्या जीवाभावाचा असल्‍याने, उभ्‍या महाराष्‍ट्रातील शेतकरी असंतोषाचे नेतृत्‍व वेळप्रसंगी आम्‍हाला करावे लागेल तरी आम्‍ही करू,' असा इशारा उदनयराजे भोसले यांनी दिला आहे.

काय म्हणाले उदयनराजे भोसले?

"अकाली-अवकाळी पावसाने कोलमडलेल्‍या बळी राजाला शासनाने योग्‍य ती मदत देवून धीर द्यावा.

अकाली-अवकाळी आलेल्‍या पाऊस, अतिवृष्‍टी, पूरस्‍थिती इत्‍यादीमुळे ग्रामीण भागात झालेल्‍या शेती आणि व्यवसायाचे झालेले नुकसान एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावून, नुकसान भरपाईचा कायदा व योग्‍य ती आर्थिक तरतुद करुन, एका महिन्याच्या आत करण्यात यावी, ईर्मा योजना तातडीने लागू करावी.

Loading...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उपाययोजना सुचवताना राज्‍याचे मा. राज्‍यपाल, मुख्यमंत्री, आणि मुख्य सचिव, यांना दिलेल्‍या निवेदनात नमूद केले आहे की, यावर्षी ऑगस्‍ट महिन्यात राज्‍यातील काही भागात विशेष करुन, सातारा, सांगली, कोल्‍हापूर जिल्‍हयांमध्ये फार मोठा पूर आला. त्‍यामुळे शेती पिकांचे-जनावरांचे व शेतकऱ्यांच्या साधन संपत्‍तीचे आणि ग्रामीण भागातील 12 बलुतेदार व 18 अलुतेदार यांच्या व्यवसायांचे मोठे नुकसान झाले आहे.

या पूरपरिस्‍थितीच्या वेळी सार्वत्रिक निवडणुका लागल्‍यामुळे नुकसान भरपाईचा प्रश्न अधांतरी राहिला. आता वादळ,चक्रीवादळ, हवामान बदल, यामुळे मान्सूनचा परतीचा पाऊस हा मुक्‍काम करुन राहिला आहे. हातातोंडाला आलेली पिके, ज्‍वारी,बाजरी, भुईमुग, सोयाबीन, कापूस, आलं,बटाटे, कांदा, टॉमॅटो, डाळी, द्राक्षं,डाळींब, केळी, भाजीपाला या सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्‍याचबरोबर मिड खरिपाची पिकेही गेली आहेत. पावसाने मुक्‍काम हलवलेला नसल्‍याने, सदस्‍थितीत शेतकरी, रब्‍बीच्या पिकांची मशागतही करु शकलेला नाही. पश्चिम महाराष्‍ट्राबरोबरच मराठवाडा, उत्‍तर महाराष्‍ट्र, विदर्भातील काही भाग, पूर्ण कोकणपट्‌टा या भागात खाण्याच्या पिकांबरोबर, ऊसपिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.ज्‍याप्रमाणे माणसात रोगराई पसरती, त्‍याप्रमाणे पिकांची रोगराई पसरली आहे.

ग्रामीण भागातील सर्व छोटे व्यावसायिक एकतर पुराच्या पाण्यात गेले किंवा आर्थिकदृष्‍टया ग्रामिण भाग उध्वस्‍त झाल्‍याने, त्‍यांचा धंदा बसला.जी गोष्‍ट पिकांची तीच गाई-म्‍हेशी, शेळया-मेंढया आदी जनावरांची झाली. ग्रामिण भाग उध्वस्‍त झाला आहे. आम्‍ही दहा वर्षापासून मागणी करत असलेली ईर्मा योजनेची जर अंमलबजावणी झाली असती तर शेतक-यांना मदतीसाठी केंद्र व राज्‍य सरकारकडे हात पसरावे लागले नसते.

उपायोजनांची अंमलबजावणी झाली नाही तर शेतकऱ्यांचा असंतोष हा कायदा- सुव्यवस्‍था पाळण्याच्या पलीकडे असेल. त्‍यावेळी आम्‍हाला रयतेबरोबर-जनतेबरोबर रहावे लागेल. आता तरी “देरसे आये लेकिन दुरुस्‍त आये” या म्‍हणी प्रमाणे शेतक-यांच्या उत्‍पन्नाला, अस्‍मानी व सुलतानी संकटापासून संरक्षण देण्यासाठी जगातील जपान-अमेरिका- ब्राझील आदी प्रगत देशाप्रमाणे ईर्माचा कायदा करावा व त्‍याची कार्यवाही सुरु करावी. जीवाभावाच्या शेतक-यांबरोबर आम्‍ही सदैव राहणार असून, त्‍यांनी धीर सोडू असे आवाहन करीत आहे."

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2019 09:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...