राष्ट्रवादीच्या 'या' खेळीमुळे उदयनराजेंचा सावध पवित्रा, भाजप प्रवेश का थांबला?

राष्ट्रवादीच्या 'या' खेळीमुळे उदयनराजेंचा सावध पवित्रा, भाजप प्रवेश का थांबला?

बेधडक स्वभावासाठी परिचित असणारे उदयनराजे आपल्या राजकीय वाटचालीबाबत सावध पाऊलं का टाकत आहेत, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

  • Share this:

मुंबई, 3 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावरून गेल्या काही दिवसांत अनेक घडामोडी घडत आहेत. उदयनराजे भाजपमध्ये दाखल होणार की राष्ट्रवादीतच राहणार, याबाबतचा संभ्रम अद्यापही कायम आहे. त्यामुळे आपल्या बेधडक स्वभावासाठी परिचित असणारे उदयनराजे आपल्या राजकीय वाटचालीबाबत सावध पाऊलं का टाकत आहेत, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

उदयनराजे भोसले यांनी पक्ष सोडणं राष्ट्रवादीसाठी अडचणीचं ठरू शकतं. कारण सातारा लोकसभा मतदारसंघातील उदयनराजेंच्या पाठीमागे असणारा मोठा मतदार राष्ट्रवादीपासून दूर जाईलच, शिवाय महाराष्ट्रभर उदयनराजेंना मानणारा जो मोठा वर्ग आहे तो देखील दुरावण्याची राष्ट्रवादीला भीती आहे. त्यामुळेच आधी राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी आणि नंतर खासदार अमोल कोल्हे यांनी उदयनराजेंची भेट घेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

काय आहे उदयनराजेंसमोरील आव्हान?

राष्ट्रवादीसाठी उदयनराजेंचं पक्षात राहणं फायद्याचं आहे. मात्र ही गरज एकतर्फी नसल्याचं साताऱ्यातील स्थानिक राजकारणातून यापूर्वीच दिसून आलं आहे. कारण उदयनराजेंसारख्या दिग्गज नेत्यालाही याआधी निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. त्यामुळे स्वत:च्या करिष्म्यासोबत पक्षाची संघटनात्मक ताकद मागे उभी असणं उदयनराजेंसाठी गरजेचं असल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे. भाजप प्रवेशाबाबत विचारमंथन करण्यासाठी बोलवलेल्या बैठकीतही उदयनराजेंनी आपल्या कार्यकर्त्यांना आव्हानांची जाणीव करून दिली होती. 'या निवडणुकीत माझं मताधिक्य घटलं आहे. एकप्रकारे हा पराभवच आहे. त्यामुळे पुढचा निर्णय घेताना घाई नको,' असंही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादी सोडणं उदयनराजेंसाठी तितकंच सोपं नसल्याचं दिसत आहे.

दरम्यान, सगळ्या आव्हानांचा सामना करत उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडत जर भाजप प्रवेशाचा निर्णय घेतलाच तर त्यांना आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे राजेंना पुन्हा लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा सामना करावा लागेल. तेव्हा राष्ट्रवादीकडून उदयनराजेंसमोर कडवं आव्हान निर्माण केलं जाण्याची शक्यता आहे. कारण 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळीही सातारा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील आणि अन्य काही नावं चर्चेत होती. त्यामुळे उदयनराजेंनी पक्ष सोडल्यास राष्ट्रवादी दुसऱ्या नेत्यांना ताकद देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवरच उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाला उशीर होत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीआधी उदयनराजे नक्की काय निर्णय घेतात, यावर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक राजकीय गणितं अवलंबून असणार आहेत.

राज्य बँक घोटाळा: अजित पवारांवर अटकेची टांगती तलवार

Published by: Akshay Shitole
First published: September 3, 2019, 9:59 AM IST

ताज्या बातम्या