उदयनराजेंची मुख्यमंत्र्यांसोबत झाली बैठक; तब्बल दीड तास चर्चा, पण...

उदयनराजेंची मुख्यमंत्र्यांसोबत झाली बैठक; तब्बल दीड तास चर्चा, पण...

उदयनराजे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. यामध्ये उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाबाबत खलबतं झाली असल्याची माहिती आहे.

  • Share this:

मुंबई, 11 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी काल (मंगळवारी)झाली. यावेळी उदयनराजे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. यामध्ये उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाबाबत खलबतं झाली असल्याची माहिती आहे.

उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. मात्र अद्यापही त्यांच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब होऊ शकलेलं नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा उदयनराजेंसोबत चर्चा केली. मात्र उदयनराजेंनी केलेल्या मागण्या पूर्ण होत नसल्याने त्यांचा भाजप प्रवेश बारगळल्याचं चित्र आहे. त्यामुळे आज होणाऱ्या भाजपच्या मेगाभरतीत उदयनराजे मात्र येणार नाहीत.

दरम्यान, भाजप प्रवेशाच्या मुद्द्यावर उदयनराजे आणि त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाबाबत नकारात्मक सूर आळवला. 'राष्ट्रवादीत राहायचं की भाजपमध्ये जायचं याबाबत आमचा अजून कोणताच निर्णय झाला नाही,' अशी माहिती खासदार उदयनराजेंसोबतच्या बैठकीनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली. भाजपकडून मागण्या मान्य होत नसल्याने उदयनराजेंनी यू-टर्न घ्यावा असा कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचीही माहिती आहे.

खासदारीच्या राजीनाम्यानंतर विधानसभेची आणि लोकसभेची पोट निवडणूक एकत्र लावण्यासाठी उदयनराजेंचा आग्रह आहे. मात्र ही मागणी पूर्ण होत नसल्याने उदयनराजे संभ्रमात असल्याची माहिती आहे. उदयनराजे आज रात्रीपर्यंत आपला अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.

उदयनराजे का टाळू शकतात भाजप प्रवेश?

राष्ट्रवादीसाठी उदयनराजेंचं पक्षात राहणं फायद्याचं आहे. मात्र ही गरज एकतर्फी नसल्याचं साताऱ्यातील स्थानिक राजकारणातून यापूर्वीच दिसून आलं आहे. कारण उदयनराजेंसारख्या दिग्गज नेत्यालाही याआधी निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. त्यामुळे स्वत:च्या करिष्म्यासोबत पक्षाची संघटनात्मक ताकद मागे उभी असणं उदयनराजेंसाठी गरजेचं असल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे. भाजप प्रवेशाबाबत विचारमंथन करण्यासाठी बोलवलेल्या बैठकीतही उदयनराजेंनी आपल्या कार्यकर्त्यांना आव्हानांची जाणीव करून दिली होती. 'या निवडणुकीत माझं मताधिक्य घटलं आहे. एकप्रकारे हा पराभवच आहे. त्यामुळे पुढचा निर्णय घेताना घाई नको,' असंही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादी सोडणं उदयनराजेंसाठी तितकंच सोपं नसल्याचं दिसत आहे.

VIDEO : 'वंचित'शी काडीमोड घेतल्यानंतर ओवेसींची पहिली प्रतिक्रिया

Published by: Akshay Shitole
First published: September 11, 2019, 8:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading