नाशिक, 13 सप्टेंबर: वर्षा सहलीसाठी आलेल्या 5 जिवलग मित्रांपैकी 2 मित्रांचा धबधब्याच्या पाण्यात बुडून मृत्यू दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर तिघांना वाचवण्यात गावकऱ्यांना यश आलं आहे. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील चोरचावडी धबधबा येथे रविवारी दुपारी ही घटना घडली. शुभम नारायण गुजर (वय 18) आणि ऋषिकेश शशिकांत तोटे (वय 18, रा. वडाळीभोई, चांदवड) अशी मृतांची नावं आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा...भाजपच्या महिला आमदार कोरोना पॉझिटिव्ह, मराठा मोर्चाच्या बैठकीला होत्या उपस्थित
मिळालेली माहिती अशी की, चांदवड तालुक्यातील वडाळीभुई येथील अजिंक्य जाधव, संकेत जाधव, सागर जाधव, शुभम गुजर, ऋषिकेश तोटे हे पाच मित्र चोरचावडी धबधबा परिसरात पर्यटनासाठी आले होते. पाचही जण धबधब्याच्या पाण्यात पोहोण्यासाठी उतरले. पाण्याच्या पातळीचा अंदाज न आल्यानं पाचही जण बुडू लागले. पाचपैकी अजिंक्य, सागर आणि संकेत या तिघांना बऱ्यापैकी पोहोता येत होतं. तिघे पाण्याबाहेर आले. मात्र, शुभम व ऋषिकेश या दोघांना मात्र जलसमाधी मिळाली. दोघांना शोधण्यासाठी गावातील पट्टीच्या पोहोणाऱ्यांना पाचारण करण्यात आले. दोन्ही मित्रांचा पाण्यात शोध घेण्यात आला. दोघे मित्र सापडले तेव्हा ते एकमेकांच्या मिठीत होते. शुभम आणि ऋषिकेश एकमेकांचा बचाव करताचा प्रयत्न करत असावेत, असं पोहोणाऱ्यानी सांगितलं. दोघांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला आहे.
हेही वाचा...कंगना विषय आमच्यासाठी बंद, मात्र प्रत्येक गोष्टींवर आमची नजर; राऊतांचा इशारा
दहिवड येथे सुप्रसिद्ध चोरचावडी धबधबा आहे. जिल्ह्यात होणाऱ्या पावसामुळे सध्या चोरचावडी धबधबा ओसांडून वाहत आहे. येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने चांदवडच्या वडाळीभोई येथील पाच मित्र सहलीसाठी धबधब्यावर आले होते. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे शुभम गुजर आणि ऋषिकेश तोटे या दोघांचा बुडून मृत्यू झाला. शेवटी गावकऱ्यांनी या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली. पुढील तपास देवळा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय मातोंडकर आणि सहकारी करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.