Home /News /maharashtra /

मुंबईत रहिवाशी इमारतीची एक बाजू कोसळली, दोघांचा मृत्यू, मुख्यमंत्री घटनास्थळी

मुंबईत रहिवाशी इमारतीची एक बाजू कोसळली, दोघांचा मृत्यू, मुख्यमंत्री घटनास्थळी

मुंबईतील फोर्ट भागातील GPO पोस्ट ऑफिस समोरील पाच मजली 'भानुशाली' बिल्डिंगची एक बाजू कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई, 16 जुलै: मुंबईतील फोर्ट भागातील GPO पोस्ट ऑफिस समोरील पाच मजली 'भानुशाली' बिल्डिंगची एक बाजू कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, आणखी काही जण ढिगाऱ्याखाली उडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.  अग्निशमन दलाच्या 14 गाड्या आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून रेस्क्यु ऑपरेशन सुरू आहे. NDRF देखील घटनास्थळी दाखल झालं आहे. मदत कार्यात कॅमेरा आणि अत्याधुनिक उपकरणांची मदत घेण्यात येत आहे. घटनेची भीषणता लक्षात घेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनास्थळी पोहोचले आहेत. मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग आणि बीएमसी आयुक्त आयुक्त इकबालसिंग चहल यांच्याकडून घटनेचा आढावा घेतला. मिळालेली माहिती अशी की,  गुरूवारी संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास इमारतीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जणांवर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. भानुशाली बिल्डिंग मालकाचं नाव मोती भाटीया असं आहे. ही इमारत धोकादायक होती, तिला नोटीसही बजावण्यात आली होती, अशी माहिती समोर आहे. दुर्घटनाग्रस्त इमारत ही रहिवाशी आणि व्यावसायिक आहे. दुर्घटना घडली तेव्हा इमारतीत 20 जण असण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि बीएमसीचे आयुक्त इकबालसिंग चहल  घटनास्थळी दाखल झाले. भानुशाली ही इमारत पाच मजली आहे. गुरुवारी याच इमारतीचा जवळपास 40 टक्के भाग कोसळला. मुंबईत गेल्या तीन दिवसापासून जोरदार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, इमारत कोसळण्याची गुरुवारी दिवसभरातील ही दुसरी घटना आहे. हेही वाचा...दिवसा हॉटेलमध्ये काम, रात्री शाळेत अभ्यास, ह्या पठ्ठ्यानं 12 वी मिळवलं घवघवीत यश मुंबईतील मालाडमध्ये अब्दुल हमीद मार्गावरील मालवणी परिसरात एका चाळीतील दुमजली घर कोसळलं. ही दुर्घटना गुरूवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. ढिगाऱ्याखाली दबून एका 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर 6 नागरिकांना बाहेर काढण्यात आलं आहे. बुधवारीही मरिन लाईन परिसरातील एका इमारतीचा भाग कोसळला होता.
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या