भिवंडी, 26 जून : राबोडी येथील पतीच्या मामाकडे पाहुणचार करून बोरिवली (पडघा) येथे पतीसोबत दुचाकीवरून घरी परतत असताना भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील महिला व तिची दोन मुले जागीच ठार तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी मुंबई नाशिक महामार्गावरील वालशिंद गावच्या हद्दीत घडली आहे.
अरबीना सलीम खान (26),वसीम खान (5 वर्ष 6 महिने) ,रिहान खान (3 वर्ष ) अशी अपघातात ठार झालेल्या माय लेकांची नावे असून चालक पती सलीम खान (34 ) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा (ऑरेंज हॉस्पिटल ) रुग्णालयात दाखल केले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आलं आहे.
या घटनेचे अधिक वृत्त असे की सलीम खान हा त्याच्या ठाणे येथील मामाकडे पत्नी व दोन मुलांना घेऊन होंडा शाईन दुचाकीवरून गेला होता. दुपारचे जेवण उरकून तो कुटुंबियांसह बोरिवली येथे घरी परतत होता. त्यावेळी वालशिंद गावच्या हद्दीत असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.
या धडकेत दुचाकीवरील चौघेही रोडवर फेकले गेल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागून दुखापत झाला. अतिरक्तस्रावाने तिघा माय लेकांचा तडफडून जागीच मृत्यू झाला, तर दुचालक पती सलीम हा देखील गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघात प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास एपीआय दिपक भोई करत आहेत.
संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident news, Bhiwandi