भिंवडी, 30 ऑगस्ट: भिवंडीतील कामवारी नदीत मासेमारी करण्यासाठी गेलेले दोन सख्खे भाऊ बुडाल्याची घटना समोर आली आहे. बुडालेल्या दोन्ही भावांचा मृतदेह शोधण्यात अग्निशमक दलाला यश आले आहे. मासेमारी करताना सेल्फी काढताना दोघे पाण्यात बुडाल्याची माहिती मिळाली आहे. शहबाज अन्सारी (वय-24) आणि शाह आलम अन्सारी (वय-22) अशी मृतांची नावं आहेत. दोघेही मुंबईहून भिवंडीतील मिल्लत नगर येथील रव्हेरा प्लाम्स अपार्टमेंटमधील आपल्या घरी आले होते.
हेही वाचा...आज विकेण्डलाही राज्यात होणार मुसळधार पाऊस, 24 तासांसाठी या शहरांना अलर्ट जारी
मिळालेली माहिती अशी की, शहबाज आणि शाह आलम हे दोघे भाऊ काल (29 ऑगस्ट) सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास भिवंडी येथील कामवारी नदीत चाविंद्रा पेट्रोल पंपाच्यामागे मासे पकडण्यासाठी आले होते. त्यांची आई देखील सोबत होती. मासेमारी करत असताना सेल्फी घेण्याच्या नादात एकाचा पाय घसरुन तो पाण्यात बुडाला. भावाला बुडताना पाहून दुसऱ्यानं देखील पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने एकापाठोपाठ दोन्ही सख्ख्या भावांना जलसमाधी मिळाली.
आपल्या दोन्ही मुलांना बुडताना पाहून आईनं जीवाचा आकांत केला. रस्त्याच्या दिशेने मदतीसाठी धाव घेतली. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही.
हेही वाचा....राज्यात E pass बंद होण्याची शक्यता कमीच, विजय वड्डेटीवारांनी दिली मोठी माहिती
स्थानिक तरुणांनी तातडीनं पाण्यात उतरुन शोधकार्य सुरू केले. रात्री साडे सातला शाह आलम याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तर रात्री उशीरा शहबाज अन्सारीचा मृतदेह शोधण्यात अग्निशमन दलाला यश आलं. या दुर्दैवी घटनेमुळे मिल्लत नगर भागात शोककळा पसरली आहे. स्थानिक नगरसेवक इम्रान खान यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेऊन सहकार्य केले.