तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली, आता देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरात सांभाळणार 'ही' जबाबदारी

तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली, आता देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरात सांभाळणार 'ही' जबाबदारी

कायम चर्चेत राहणारे शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख असलेले तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे

  • Share this:

मुंबई, 21 जानेवारी : महाविकासआघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदलीचा सपाटा लावला आहे. कायम चर्चेत राहणारे शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख असलेले तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांची आता नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ठाकरे सरकारमध्ये पुन्हा एकदा आयएएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या आहेत. यात सर्वाधिक चर्चेचा विषय आहे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्या ताब्यातील नागपूर महापालिकेत आता महापालिका आयुक्त म्हणून कायम चर्चेत राहणारे अधिकारी तुकाराम मुंढे. मुंढे हे नागपूर महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

यापूर्वी नवी मुंबई नाशिक महापालिका अशा ठिकाणी मुंडे यांची नियुक्ती कायम चर्चेचा विषय होता. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मुंढे यांच्यातील संघर्षामुळे फडणवीस सरकारच्या कार्यकाळात ते चर्चेत राहिले होते. त्यानंतर   मुंढे यांना साइड पोस्टिंग म्हणून असलेली एड्स नियंत्रण सोसायटी या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती. आता परत मुंढे यांना फडणीस यांच्या ताब्यात असणार्‍या नागपूर महापालिकेत जबाबदारी देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासकीय खेळी केल्याचं बोललं जातंय.

त्यामुळे भाजपच्या ताब्यात असणाऱ्या नागपूर महापालिकेतील लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी मुंढे यांचे भविष्यात कसे सुरू जुळतात हेच पाहावे लागणार आहे.

दुसरीकडे पुणे महापालिका आयुक्त पदावर असणारे सौरभ राव यांची बदली करण्यात आली असून ते आता साखर आयुक्त असतील. तर साखर आयुक्त असणारे शेखर गायकवाड हे पुणे महापालिका आयुक्त असतील. संपदा मेहता हे जॉईंट कमिशनर सेल टॅक्स तर रणजीत सिंग देओल एमआरसी एमडी असतील.

प्राजक्ता लवंगारे यांच्याकडे मराठी भाषा विभागाच्या सचिव पदाची जबाबदारी दिली असून ए एम कवडे सहकार आयुक्त असेल दिनेश वाघमारे हे विद्युत पारेषणचे चेअरमन तर आयुष प्रसाद पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

मुंढे आणि बदल्या

आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळं तुकाराम मुंढे फार काळ कुठेच टिकले नाहीत. 2005 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. प्रोबेशननंतर 2006 मध्ये त्यांनी सोलापूरचे आयुक्त म्हणून कामाला सुरूवात केली. गेल्या 13 वर्षात त्यांच्या तब्बल 13 वेळा बदल्या झाल्या आहेत.

धडाकेबाज काम, हट्टी स्वभाव आणि कुणाचाही मुलाहिजा न ठेवण्याची वृत्ती. यामुळं त्यांचा लोकप्रतिनिधींशी कायम संघर्ष होत आला आहे. वर्ष-दीड वर्षांपेक्षा जास्त काळ ते कुठेच टिकले नाहीत. मात्र, या प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. ते जिथे जातील तिथे कर्मचाऱ्यांना शिस्त लावतात. गैरव्यवहार मोडून काढतात.लोकप्रतिनिधींची मनमानी बंद करतात. त्यामुळं त्यांची वारंवार भांडणं झाली. त्यांच्याविरूद्ध अनेक ठिकाणी आंदोलनंही झाली.

नाशिकमध्ये आयुक्त होते, तेव्हा नगरसेवकांविरुद्धच्या वादात एकदा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली होती. मात्र, काही महिने वगळता शांतता फार काळ राहिली नाही. आपल्या स्वभावाला मुरड घाला असं त्यांना अनेकदा सांगण्यात आलं होतं. मात्र, मुंढेंनी कधीच आपला स्वभाव बदलला नाही. त्यामुळे त्यांची बदली थेट मंत्रालयात करण्यात आली होती. परंतु, इथंही मुंढे यांनी पदभार स्वीकारलाच नाही. त्यामुळे डिसेंबर 2018 मध्ये राज्य एड्स नियंत्रण सोसायटीमध्ये बदली करण्यात आली होती. आता चालू वर्षाच्या पहिल्याच महिन्यात तुकाराम मुंढे यांची नागपूरमध्ये बदली करण्यात आली आहे.

First published: January 21, 2020, 8:31 PM IST

ताज्या बातम्या