Triumph बाइकने दर रविवारी करायचा 'तो' रेस, अचानक समोरून आला टँकर अन्...

Triumph बाइकने दर रविवारी करायचा 'तो' रेस, अचानक समोरून आला टँकर अन्...

शाहिद हा बाईक रायडर असून तो आठवड्यातील प्रत्येक रविवारी मुंबई ते घोटी महामार्गावर मोटार रेसिंग करत होता.

  • Share this:

रवी शिंदे, प्रतिनिधी

भिवंडी, 23 फेब्रुवारी : मुंबई-नाशिक महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात भिवंडीतील बाइक रायडरचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दर रविवारी तो महागड्या triumph daytona बाईकवरून सराव करत होता. परंतु, त्याचा हा सराव आज अखेरचा ठरला.

भिवंडीत राहणाऱ्या मोहम्मद शाहिद हुसेन शेख (वय 35)असं मृत झालेल्या रायडरचं नाव आहे. शाहिद हा बाइक रायडर असून तो आठवड्यातील प्रत्येक रविवारी मुंबई ते घोटी महामार्गावर मोटार रेसिंग करत होता.

आजही तो सराव करण्यासाठी बाहेर निघाला. आज  सकाळी नाशिकहून तो परत येत होता. शाहिद शहापूर तालुक्यातील लाहे गावाजवळ पोहोचला असता समोरून येणाऱ्या पाण्याच्या टँकरला त्याने जोरात धडक दिली.  ही धडक इतकी भीषण होती की, यात बाइकचा चुराडा झाला. बाईकचा समोरच्या भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला.  बाइक टँकरच्या चाकाखाली आल्यामुळे दूरपर्यंत फरफटत  गेली. या भीषण अपघातात शाहिदचा जागीत मृत्यू झाला. विशेष म्हणजे, शाहिदने रेसिंग करत असताना संपूर्ण खबरदारी घेत हेल्मेट आणि जॅकेट परिधान केले होते. पण, या भीषण अपघातात त्याचाही निभाव लागू शकला नाही.

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी शाहिद शेखच्या बाईकचा वेग जास्त होता. अचानक समोर आलेल्या टँकरमुळे त्याचं बाईकवरील नियंत्रण सुटले आणि जोरात धडक बसली. जबर मार लागल्यामुळे  शाहिद शेखचा जागीच मृत्यू झाला.

शाहिद शेखकडे triumph daytona 675 ही महागडी बाईक होती. या बाईकची किंमत 12 लाख रुपयांच्या घरात आहे. शाहिद शेखच्या मृत्यूमुळे या मार्गावर सराव करणाऱ्या बाइक रायडरला  मोठा धक्का बसला आहे. बाइकचं वेड असलेल्या शाहिदच्या मृत्यूमुळे परिवार आणि मित्रांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा मृतदेह घेण्यासाठी शासकीय रुग्णालयाबाहेर मित्र आणि नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.

या प्रकरणी टँकर चालकावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक निलेश कदम हे अधिक तपास करीत आहेत.

अशी आहे triumph daytona 675 !

ट्रायंफ या जगप्रसिद्ध बाईक कंपनीचे डेटोना 675 हे मॉडेल आहे. ट्रायंफने यामध्ये 675 आणि 675r असे दोन मॉडेल 2013 मध्ये भारतात लाँच केले होते. triumph daytona 675 या बाईकचे इंजिन हे 675 CCC आणि 3 सिलिंडर आहे. ही बाईक तब्बल 117 bhp इतकी पॉवर जनरेट करते.  या बाईकमध्ये 6 स्पीड गिअर बॉक्स देण्यात आला आहे. 0.100 किमीची वेग गाठण्यासाठी या बाईकला फक्त 3.30 सेंकदाचा वेळ लागतो. या बाईकची किंमतही 11 ते 12 लाख इतकी आहे.

First published: February 23, 2020, 8:03 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading