ट्रिपल सीट येणाऱ्या तरुणांनी वाहतूक पोलिसाला उडवलं, धक्कादायक VIDEO

ट्रिपल सीट येणाऱ्या तरुणांनी वाहतूक पोलिसाला उडवलं, धक्कादायक VIDEO

तिन्ही तरुण हे कफ परेड परिसरातले रहिवाशी असून ट्रिपल सीट प्रवास करत होते. तेव्हा रस्त्यावर समोरूनच वाहतूक पोलीस हवालदार शरद नाना पाटील येत होते

  • Share this:

मुंबई, 13 जानेवारी : मुंबईत कुलाबा परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणांनी ट्रॅफिक कॉन्स्टेबललाच धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणी तीन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.

तिन्ही तरुण हे कफ परेड परिसरातले रहिवाशी असून ट्रिपल सीट प्रवास करत होते. तेव्हा रस्त्यावर समोरूनच वाहतूक पोलीस हवालदार शरद नाना पाटील येत होते. अचानक समोरून पोलीस हवालदार येत असल्याचं पाहून मुलांनी गाडी पळवण्याचा प्रयत्न केला. यात त्यांनी  नाना पाटील यांना जोरात धडक दिली.  ही धडक इतकी जोरात होती, नाना पाटील हे दूर पर्यंत फेकले गेले.

या अपघातात नाना पाटील गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.  अटक करण्यात आलेले तिन्ही तरुणांची नावं राजेश चव्हाण, आकाश राठोड आणि गोविंद राठोड अशी आहेत. अपघात झालेली बाईकसुद्धा पोलिसांनी जप्त केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

अज्ञात वाहनाने वाहतूक पोलिसांला चिरडले

दरम्यान, नागपूर-जबलपूर महामार्गवर अज्ञात वाहनाने वाहतूक पोलिसांना चिरडल्याची घटना घडली. एकाचा जागेवरच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. मरारवाडी गावाजवळ रविवारी सकाळी हा अपघात झाला. महामार्गावर बोलेरो आणि कारमध्ये भीषण अपघात झाला होता. यावेळी कारमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी रस्ता ओलांडताना पोलिसांना विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. या एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागेवर मृत्यू झाला. जखमी पोलिस कर्मचाऱ्याला उपचारासाठी हॉस्पिटसमध्ये हलवण्यात आले आहे. त्याचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

दरवर्षी दीड लाख लोक गमवतात प्राण..

भारतात दरवर्षी पाच लाख अपघात होतात. यात दीड लाख लोकांना आपले प्राण गमवावे लागतात. ही धक्कादायक आकडेवारी आहे. समाधानाची बाब म्हणजे, तामिळनाडूमध्ये अपघाताचे प्रमाण 29 टक्क्यांने तर मृत्यूचे प्रमाण 30 टक्क्यांनी कमी झाले आहेत. यामुळे रस्ता अपघात कमी करणाऱ्या या तामिळनाडू पॅटर्नचा अभ्यास करणे गरजेचे आहे, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सुक्ष्म-लघु-मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

जिल्हा सुरक्षा समिती, प्रादेशिक परिवहन कार्यालय व पोलीस नागपूर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 31 व्या रस्ता सुरक्षा अभियानाला प्रारंभ झाला. याच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. मंचावर पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महामार्ग पोलीस अधीक्षक संजय शित्रे आदी उपस्थित होते.

संजय शित्रे म्हणाले, एकूण अपघातांमध्ये सर्वाधिक अपघात दुचाकीचे होतात. यात हेल्मेट न घालणे, रॅश ड्रायव्हिंग, गतीवर नियंत्रण नसणे व वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे हे मुख्य कारण आहेत. यामुळे प्रत्येक वाहन चालकाने वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Published by: sachin Salve
First published: January 13, 2020, 7:43 PM IST

ताज्या बातम्या