हरिष दिमोटे, शिर्डी, 13 जुलै : शिर्डी येथे आज भल्या सकाळी एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली आहे. तसंच संपूर्ण कुटुंबावर झालेल्या या हल्ल्यात जखमी झालेले दोन जण अत्यवस्थ असून त्यांना संस्थान रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
निमगाव शिवारात आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मंगेश कातोरे यांच्या वस्तीवर राहणाऱ्या ठाकूर कुटुंबीयांवर हल्ला करण्यात आला. हल्ला करणारा आरोपी अर्जुन पन्हाळे हा शेजारीच राहणारा असून किरकोळ वादातून हा प्रकार झाल्याची माहिती आहे. आरोपी अर्जुन पन्हाळे याने कोयत्याने ठाकूर पती-पत्नींचे गळे कापले. तसंच त्यांची 16 वर्षाची मुलगी शाळेत जाण्यासाठी आवरत असताना तिचीही कोयत्याने हत्या केली.
या हल्ल्यात राजेंद्र ठाकूर आणि याच कुटुंबातील आणखी एक मुलगी जखमी असून त्यांना साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये एक सहा वर्षांची चिमुकली थोडक्यात बचावली आहे. या घटनेची पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पोलीस निरीक्षक अनील कटके अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळी सर्वत्र रक्ताचा सडा पडलेला होता. हत्येनंतर आरोपी शेजारीच असलेल्या आपल्या खोलीत जाऊन बसला. त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
राम शिंदेंनी केली शेतकऱ्यांसोबत खरीपाची पेरणी, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या