सोलापूर, 15 एप्रिल: सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाबाधितची ट्रॅव्हल हिस्ट्री लपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप कॉंग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी केला आहे.
12 एप्रिल रोजी सोलापुरात मृत्यू पश्चात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर काल त्याच्या संपर्कातील एका महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. मात्र धक्कादायक बाब म्हणजे मृत कोरोनाबाधित किराणा दुकानदाराला लागण कशी झाली? त्याच्या प्रवासाची कोणतीच माहिती अद्याप जिल्हा प्रशासनाने जाहीर केली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासन पालकमंत्र्यांच्या दबावाखाली काम करत असून त्यांच्या कामाबाबत सांशकता व्यक्त होत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी केला आहे.
हेही वाचा...मुंबईत कोरोनाचा आणखी एक बळी, SRV हॉस्पिटलमध्ये बेस्ट कर्मचाऱ्याचा मृत्यू
दिल्लीतील मरकजवरुन आलेल्या 47 तबलिगींचा तपास अद्याप पूर्ण झाला नाही. त्यातच जितेंद्र आव्हाड यांची सोलापुरच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती केली. त्यानंतर त्यांनी सोलापूर जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर तबलिगींचा तपास शिथील झाल्याचा आरोपही माजी जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी केला. तसेच गृहनिर्माणमंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांचे पालकमंत्रिपद काढून घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोलापूरचे पालकमंत्रिपद भुषवावे, अशी मागणीही संतोष पाटील यांनी केली आहे. दरम्यान या आरोपामुळे जिल्हाभरात कोरोना उपाययोजनेबाबत उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आता या आरोपांचे खंडन कसे करते आणि मृत कोरोनाबाधित व्यक्तीची ट्रॅव्हल हिस्ट्री जाहीर करते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा...देशात कोरोनाचं वाढतं थैमान, आता मोदी सरकारने आखला नवा प्लॅन
कोणाच्या दबावाखाली काम करत नाही...
सोलापुरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी या आरोपाबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही संबंधित मृत कोरोनाबाधित व्यक्तीची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासत आहोत. त्यामध्ये 20 मार्चपासून संबंधित मृत किराणा दुकानदार असलेला व्यक्ती ही घराबाहेर गेली नाही. तत्पुर्वीच्या प्रवासाबाबतही तपास घेत आहोत. तर त्याच्या संपर्कातील महिलेची देखील ट्रॅव्हल हिस्ट्री तपासत आहोत. त्यामुळे जिल्हा प्रशासन कोणत्याही प्रकारची माहिती लपवणे अथवा कोणाच्या दबावाखाली काम करत नसल्याचेही जिल्हाधिकारी मिलिद शंभरकर यांनी स्पष्ट केले.
याशिवाय सोलापुरचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांना विचारले असता त्यांनीही याबाबतचा तपास सुरु असून तपास पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना तपास अहवाल दिला जाईल, असे अंकुश शिंदे यांनी 'News18 लोकमत'शी बोलताना स्पष्ट केलं आहे.
संपादन- संदीप पारोळेकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus, Solapur, Symptoms of coronavirus