आयुक्तालयात आले विना हेल्मेट, बाहेर पडताच पोलिसांनाच फाडावी लागली पावती!

आयुक्तालयात आले विना हेल्मेट, बाहेर पडताच पोलिसांनाच फाडावी लागली पावती!

विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यावर कारवाईमध्ये चक्क पोलिसावरच कारवाई करण्याची वेळ पोलिसांवर आली

  • Share this:

ठाणे, 07 फेब्रुवारी : 'गाडी बाजूला घ्या..,डोक्यावर हेल्मेट नाही..लायसेन्स दाखवा...' अहो मी वागळे पोलीस ठाण्यात पोलीस आहे. कामासाठी आयुक्तालयात आलो होतो'. 'तुम्ही पोलीस असा की कोणी आम्हाला काही सांगायचे नाही. दंड भरावाच लागेल' असं म्हणत  ठाणे  पोलीस आयुक्तालयाच्या दारातच पोलिसांनी पोलिसांकडून दंड वसूल केला आहे.

विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यावर कारवाईमध्ये चक्क पोलिसावरच कारवाई करण्याची वेळ पोलिसांवर आली. कामानिमित्त आयुक्तालयात आलेल्या विविध पोलिसांवर ही थेट कारवाई करण्यात आली होती.

पोलीस उप निरीक्षक अशोक बाराते यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईमध्ये सुमारे 40 हुन अधिक पोलीस दंडाच्या कारवाईमध्ये सापडले आहे. ही कारवाई करत असताना त्या पोलिसांचे लायसेन्स तसंच दुचाकी कोणाच्या नावावर आहे, ही तपासणी सुद्धा केली जात होती. अशी कारवाई आपल्यावर होणार नाही अशा भ्रमात असलेल्या आणि विना हेल्मेटगाडी चालवणारे सगळेच या कारवाईत पकडण्यात आले.

अगदी गृह रक्षक दलाच्या जवान तसंच पोलीस शिपाई आणि काही उच्च पदावर असलेले पोलीस या कारवाईमध्ये सापडले.

सध्या शहरात विना हेल्मेट धारकवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. पण, ही कारवाई पोलिसांवर आणि ती सुद्धा थेट आयुक्तालयाच्या दारात करण्यात आल्याने सर्व सामान्य नागरिकानी समाधान व्यक्त केले आहे.

 मुंबईच्या या पोलिसाला सलाम! HEART ATTACK आलेल्या प्रवाशाचा खांद्यावर नेवून वाचवला जीव

दरम्यान, घाटकोपर रेल्वे स्थानकात आज सकाळी एका प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला. त्या प्रवाश्यासाठी रेल्वे लोहमार्ग पोलीस देवदूत म्हणून धावले. त्यातील धनंजय गवळी हा पोलीस कर्मचारी हृदयविकाराचा झटका आलेल्या प्रवाशाला रुग्णवाहिकेपर्यंत आपल्या खांद्यावर घेऊन गेला. तसंच रुग्णालयात दाखल करून त्या प्रवाशाचा जीव वाचवला.

अलिकडच्या काळात जनतेच्या मनात पोलिसांविषयी वेगळी प्रतिमा निर्माण झाली आहे. असं असताना काही पोलीस मात्र आपल्या खात्याचं नाव उंचावत जनतेमध्ये विश्वास निर्माण करत आहेत. कुर्ला रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्या अंतर्गत पोलीस हवालदार रवींद्र सोनवणे,शिपाई धनंजय गवळी आणि महिला पोलीस कर्मचारी प्रतिभा अभंग, रुपाली निमसे हे आज सकाळी 9 वाजता घाटकोपर रेल्वे स्थानकात कर्तव्यावर होते.

बदलापूर येथून जलद लोकलने पकडून आलेले प्रवासी प्रकाश बाबसहरब गच्छे हे घाटकोपरमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर उतरले. तेव्हा अचानक त्यांच्या छातीत अचानक कळा सुरू झाल्या आणि त्यांना हृदय विकाराचा झटका आला. प्रवाशांनी आरडाओरडा केला आणि तिथं तैनात असलेल्या हमालांना बोलावण्याचा प्रयत्न केला.

मुंबईवर राहणार आता 'बिग बॉस'ची नजर, राज्य सरकारची मोठी घोषणा

स्टेशनवरील हमाल वेळेत न आल्याने पोलीस शिपाई धनंजय गवळी यांनी प्रकाश गच्छे यांना आपल्या खांद्यावर उचलले आणि घाटकोपर स्टेशन बाहेर असलेल्या रुग्णवाहिकेपर्यंत नेलं. त्यानंतर त्यांना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

सध्या प्रकाश गच्छे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी दाखवलेल्या तत्परतेमुळे पोलीस कर्मचाऱ्याचं सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

First published: February 7, 2020, 11:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading