मुंबई, 23 जानेवारी : कुख्यात दहशतवादी संघटना आयसिसशी संबंध असल्याच्या संशयातून ताब्यात घेण्यात आलेल्या तरूणांकडून घातक रसायनं जप्त करण्यात आली आहे. या जीवघेण्या रसायनांचा वापर करून प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यात विषप्रयोग करण्याचा डाव होता का? या अनुषंगानं एटीएसचा तपास सुरू आहे.
महाराष्ट्र एटीएसनं औरंगाबाद आणि मुंब्रामधून 9 संशयितांना ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेले तरूण हे उम्मत-ए-मोमदिया संघटनेशी निगडीत असल्याचं तपासात उघड झालं आहे.
आरोपींकडून ग्लिसरीन, युरिया, एसिटॉन सारखी जीवघेणी रसायनं जप्त करण्यात आली आहेत. औरंगाबादमधून अटक करण्यात आलेल्यांना 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
व्हाॅट्सअॅप ग्रुप केला होता तयार
एटीएसने केलेल्या चौकशीत या सर्व संशयितांनी एक व्हाॅट्सअॅप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपमध्ये आयसिसशी संबंधीत माहिती शेअर केली जात होती. एटीएसने कोर्टात सांगितलं की, या संशयितांनी अनेक चॅट या डिलीट केल्या होत्या. हे संशयित विषारी बाॅम्ब तयार करणार होते अशी माहितीही त्यांच्याकडून मिळाली आहे.
अनेक मोठे कार्यक्रम होते निशाण्यावर
औरंगाबाद आणि मुंब्य्रातून ताब्यात घेतलेल्या संशयित दहशतवाद्यांचा विषारी हल्ला करण्याचा डाव होता. त्यांच्या निशाण्यावर अनेक मोठे कार्यक्रम होते. या कार्यक्रमांमध्ये खाण्याचे पदार्थ आणि पाण्यात विषारी रसायन मिसळून घातपात घडवायचा होता. 9 पैकी 3 दहशतवादी सख्खे भाऊ होते तर इतर 6 जण हे मित्र होते. या ग्रुपमध्ये इतरही लोकं सहभागी असल्याचा संशय आहे. मुंबई , ठाणे आणि औरंगाबादमध्ये 8 ठिकाणी सर्च आॅपरेशन करून संशयितांना ताब्यात घेतले होते.
या संशयितांनी आपल्या संघटनेचं नाव हे उम्मत ए मोमदिया म्हणजे की 'पैंगबर के बंदे' असं ठेवलं होतं.
===================
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.