औरंगाबाद, 8 डिसेंबर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत बंद ठेवण्यात आलेली अजिंठा, वेरूळ, दौलताबाद, बिबी का मकबरा ही पर्यटनस्थळे दिनांक 9 डिसेंबर पासून पर्यटकांसाठी खुली करण्याचे आणि त्यादृष्टीने यंत्रणांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आणि पर्यटकांनी नियमांचे पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले.
जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे तसेच महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे खुली करण्याबाबत पाठपुरावा केला होता. त्या पार्श्वभूमीवर ही पर्यटनस्थळे खुली करण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात औरंगाबाद जिल्ह्ययातील पर्यटनस्थळे सुरू करण्याच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, पर्यटन उपसंचालक श्रीमंत हारकर, सहायक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, पर्यटनचे सहायक संचालक विजय जाधव, पुरातत्व विभागाचे डॉ. एम. के. चौले, मयुरेश खडके, सोनेरी महलचे ओजस बोरसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर शेळके, विभागीय नियंत्रक अरूण सिया, श्री. जसवंतसिंग अध्यक्ष औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशन टुरिस्ट गाईड संघटनेचे सचिव उमेश जाधव यांच्यासह सर्व संबंधित उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले की, जिल्ह्यातील पर्यटनस्थळे सर्व खबरदारीच्या उपाययोजनांसह सुरू करण्यात येतील जेणे करून पर्यटनस्थळावर अवलंबुन असणारे गाईड, दुकानदार, स्थानिक कारागीर, हॉटेल चालक, वाहतुक व्यवसाय करणारे ट्रान्सपोर्ट कंपनी यांना रोजगार मिळेल. या सर्व संबंधितांची कोरोना चाचणी त्या-त्या पर्यटनस्थळाच्या ठिकाणी करण्याची सुविधा संबंधित यंत्रणेने तातडीने उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशित करून जिल्हाधिकारी यांनी जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या वेरूळ व अजिंठा या स्थळांवर दर दिवशी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मर्यादित राहणार असून दर दिवशी सकाळी एक हजार आणि दुपारच्या सत्रात एका हजार अशा एकुण दोन हजार याप्रमाणे पर्यटकांना दरदिवशी मर्यादित प्रवेश दिला जाईल.
पर्यटनस्थळांवर प्रवेशासाठी केवळ ऑनलाईन किंवा क्यु आर बेस तिकिटांची नोंदणी करता येईल. यासाठी www.mtdcresorts.in तसेच www.asi.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाईन तिकिट नोंदणी करता येईल. कुठल्याही परिस्थितीत पर्यटनस्थळांवर वेळेवर तिकिट काढता येणार नाही.
तसेच पर्यटनस्थळी टुरिस्ट गाईड यांच्याव्दारा पर्यटकांना संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करून घेणे महत्वाचे असून यादृष्टीने पर्यटनस्थळे सुरळीतपणे सुरू ठेवण्यात प्रशासनासह टुरिस्ट गाईडची जबाबदारी व भूमिका महत्वपूर्ण राहील, असे सांगून जिल्हाधिकारी चव्हाण यांनी कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायझरची सुविधा संबंधित यंत्रणेने उपलब्ध करून द्यावी. तसेच पर्यटनस्थळी आरोग्य यंत्रणेने व पोलिस विभाग यांनी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात राहुन पर्यटकांना कोणतीही अडचण उद्भवणार नाही, याची काळजी घ्यावी. वेरूळ अजिंठा येथे प्रवासी वाहतूक बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी, असे निर्देश यावेळी संबंधितांना दिले.