सत्ता स्थापनेपासून ते अवकाळी पावसापर्यंत या आहेत 10 महत्त्वाच्या बातम्या

सत्ता स्थापनेपासून ते अवकाळी पावसापर्यंत या आहेत 10 महत्त्वाच्या बातम्या

सत्ता स्थापनेच्या रणसंग्रामातील घडामोडींपासून ते पावसापर्यंत राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी.

  • Share this:

मुंबई, 04 नोव्हेंबर: सत्ता स्थापनेच्या रणसंग्रामातील घडामोडींपासून ते पावसापर्यंत राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी.

1.सत्तेच्या या रणसंग्रामात पुरेसं संख्याबळ नसतानाही काँग्रेस राष्ट्रवादीनं मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर दुसरीकडे संख्याबळ असणाऱ्या शिवसेना-भाजपमधला वाद शमवण्यासाठी संकटमोचकच उरलेले नाहीत.निकाल लागून दहा दिवस उलटले आहे. सत्ता स्थापनेचा तिढा सुटायला तयार नाही. भाजप आणि शिवसेना आपआपल्या भूमिकेवर ठाम आहेत. तर दुसरीकडे दोन बडे नेते आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी थायलंड दौऱ्याहून मायदेशी पोहोचत आहेत. तर शरद पवार दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. राजकीय धुरळा उडालेला असतानाच शरद पवार मुख्यमंत्री होणार, अशी चर्चा सुरू झाल्यानं नवा ट्विस्ट आला. दिल्लीत दुपारी 12 वाजता शरद पवार आणि सोनियांची बैठक होणार आहे.

2.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्याची पाहणी मुख्यमंत्र्यांनी रविवारी केली होती. नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी यासाठी केंद्रकडे मदत मागण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीमध्ये जाणार आहेत. याच दरम्यान सत्ता स्थापनेबाबत अमित शाहांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

3.आमदार आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्गातील पिकांची पाहणी केल्यानंतर आज ते नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये आज पावसामुळे किती नुकसान झालं याचा आढावा ते घेणार आहेत. याच दरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधून पीकविम्याचीही माहिती घेणार आहेत.

4.राज्यभरात काँग्रेसचे लोकप्रतिनिधी शेतीच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. लोकप्रतिनिधींनी शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

5.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुंबईत दुपारी 3 वा. पत्रकार परिषद आहे. सध्या सुरु असणाऱ्या राजकीय घडामोडींवर जयंत पाटील काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

6.काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी आज नवा प्रस्ताव ठेवला. शरद पवारांना मुख्यमंत्री बनवलं तर काँग्रेस त्याला पाठिंबा देईल असं ठाकूर यांनी सांगितलं. यशोमती ठाकूर या राहुल गांधी यांच्या जवळच्या वर्तुळातल्या नेत्या आहेत. या आधीही शरद पवारांच्या नावाचा प्रस्ताव पुढे आला होता. त्या पार्श्वभूमीवर यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालंय.

7.खासदार संजय राऊत सोमवारी राज्यपालांची भेट घेणार आहेत.उद्या सायंकाळी पाच वाजता ते राज्यपालांना भेटणार आहेत. खासदार राऊत हे सत्तास्थापनेचा दावा करणार नाहीत मात्र घटनेनुसार सर्वात मोठ्या पक्षाला आमंत्रण द्या अशी मागणी ते करणार आहेत. राज्यातील सत्तास्थापनेच्या प्रक्रीयेला सुरुवात करावी या मागणीसाठी राज्यापालांशी ते भेटणार असल्याचं सांगितलं जात आहे.

8.सत्तास्थापनेबाबत शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतल्यानंतर भाजपने सुरुवातीच्या प्रस्तावात घातलेल्या अटी शर्तींमध्ये फेरविचार करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भाजपने मुख्यमंत्रिपदासह गृह, महसूल, नगर विकास आणि वित्त या चार महत्वाच्या खात्यांवर चर्चा होणार नाही असं स्पष्ट केलं होतं. मात्र आता या चार खात्यांपैकी दोन खात्यांवर पाणी सोडायचं का असा विचार भाजपच्या वरिष्ठ पातळीवर सुरू झाला आहे.

9.अरबी समुद्रात 6 ते 8 नोव्हेंबर दरम्यान पुन्हा मोठ्या वादळाची शक्यता असल्यामुळे मच्छीमारांना समुद्रान जावू नये असं हवामान विभागाकडून सूचना देण्यात आला आहे. दरम्यान या वादळाचा कसा परिणाम असेल याबाबत अधिक तपशील अद्याप मिळाले नाहीत. क्यार नंतर महावादळामुळे मुसळधार पावसानं थैमान घातलं आणि लाखोंची पीकं भुईसपाट केली. ऑक्टोबर उलटला तरी पावसाची रिमझिम सुरूच असल्यामुळे शेतकरी मात्र चिंतेत आहे.

10.नोव्हेंबरची सुरुवातही पावसाने झाली. मुंबई, उपनगर, नवी मुंबई, ठाण्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. पुणे आणि नाशिकमध्येही काही भागांत मुसळधार पाऊस झाला. आता पुढचे किमान 5 दिवस तरी असंच वातावरण राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

VIDEO : आमचा आहे उद्धव ठाकरेंवर डोळा, आठवलेंची अशीही कविता

First published: November 4, 2019, 7:14 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading