महात्मा जोतिबा फुलेंना त्रिवार सलाम

महात्मा जोतिबा फुलेंना त्रिवार सलाम

विचारवंत आणि समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांची आज जयंती. 11 एप्रिल 1827 ला त्यांचा जन्म झाला.

  • Share this:

11 एप्रिल : विचारवंत आणि समाजसुधारक  महात्मा जोतिराव फुले यांची आज जयंती. 11 एप्रिल  1827 ला त्यांचा जन्म झाला. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.शेतकरी आणि बहुजनसमाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली.आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.

जोतिबा फुले यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण . त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या वडिलांचं नाव गोविंदराव आणि आईचं नाव चिमणाबाई होतं. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचं काम करीत होते, त्यामुळे गोर्‍हे हे त्यांचं मूळ आडनाव असलं तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले आणि  तेच नाव पुढे रूढ झालं.

कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी इथे आला. तिथे त्यांचं घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी इथे फुले आडनावाची बरीच कुटुंबं आहेत. जोतिराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचं निधन झालं. त्यांचा विवाह वयाच्या बाराव्या वर्षी सावित्रीबाईशी झाला.

प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. इ.स. १८४२ ला माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.

बहुजन समाजाचं अज्ञान, दारिद्र आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे त्यांनी इ.स. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपवली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली.

तसंच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळपेठेत इ.स.१८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतिराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती दिली.जोतिरावांनी त्यांच्या पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केलं. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.

२४ सप्टेंबर इ.स.१८७३ रोजी महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.समाजातील विषमता नष्ट करणं  आणि तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणं हे सत्यशोधक समाजाचं ध्येय होतं.सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते. वेदांना झुगारून त्यांनी हे कार्य करण्यास सुरूवात केली. त्यांनी जातीय भेद आणि चातुर्वर्णीय भेदभावास विरोध करण्यास सुरूवात केली. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा स्त्री विभागाचं नेतृत्व सावित्रीबाई यांनी केलं.

सावित्रीबाई यांच्याबरोबर १९ स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचं कार्य सुरू केलं. त्याचवेळी त्या कन्याशाळेच्या शिक्षिका म्हणूनही कार्य करत होत्या. दीनबंधू प्रकाशनाने सत्यशोधक चळवळीच्या वेळी लेखन प्रकाशनाचं कार्य केलं.  सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठवला आणि सामाजिक न्यायाची आणि सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरूवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली.

महान समाजसुधारक जोतिबा फुलेंना  त्रिवार सलाम.

First published: April 11, 2017, 11:09 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading