पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत भारतीय चित्रपट संग्रहालयाचं उद्घाटन होणार आहे.
भाजपच्या अनुसुचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय अधिवेशन
नागपुरात आजपासून दोन दिवस भाजपच्या अनुसूचित जाती आघाडीच्या राष्ट्रीय अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. या अधिवेशनाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल. देशभरातील 4 हजारांवर प्रतिनिधी यात सहभागी होतील. दोन दिवस चालणारं हे राष्ट्रीय अधिवेशन डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात होणार असून यात नितीन गडकरी यांच्यासह अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष खासदार विनोद सोनकर, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. भाजपचे अनुसूचित जातीचे 46 खासदार तसंच दीडशेवर आमदार या अधिवेशनाला हजर राहतील.
मध्य रेल्वेवरून पहिली राजधानी धावणार
मध्य रेल्वेवरील पहिली राजधानी एक्स्प्रेस (मुंबई-दिल्ली) आजपासून धावणार आहे. ही एक्स्प्रेस नाशिकमार्गे दिल्लीला रवाना होईल. राजधानी एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून नाशिकमार्गे हजरत निझामुद्दिन (दिल्ली) चालवण्यात येणार आहे.
JNU घोषणाबाजी प्रकरणाची सुनावणी
दिल्लीतल्या प्रसिद्ध जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) 9 फेब्रुवारी 2016 मध्ये देशविरोधी घोषणा दिल्या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने 1200 पानांचं आरोपपत्र 12 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलं होतं. कन्हैया कुमार, उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य सहीत 10 जणांचा त्यात समावेश आहे. आज या प्रकरणी पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे.
महाजन-भुजबळ एकाच व्यासपीठावर
मनमाड येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन कासार समाजाच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे. या मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनाही निमंत्रण आहे. त्यामुळे दोन्ही नेते आज एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे.
=============