धुळे, नगरच्या मतमोजणीपासून ते मराठा आरक्षणापर्यंत सगळ्यात महत्त्वाच्या 5 बातम्या

धुळे, नगरच्या मतमोजणीपासून ते मराठा आरक्षणापर्यंत सगळ्यात महत्त्वाच्या 5 बातम्या

  • Share this:

धुळे-नगरमध्ये कोण मारणार बाजी

अहमदनगर आणि धुळे महापालिका निवडणुकीसाठी रविवारी शांततेत मतदान पार पडलं. धुळ्यात 60 टक्के तर अहमदनगरमध्ये 67 टक्के मतदान झालं आहे. अहमदनगर पालिकेसाठी ६८ जागांसाठी ३३९ उमेदवार रिंगणात आहेत. तर धुळ्यात १९ प्रभागातील ७३ जागांसाठी ३५५ उमेदवार रिंगणात आहेत. दोन्ही महापालिकेसाठी आज सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. धुळ्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सुभाष भामरे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. तर नगरमध्ये शिवसेनेच्या महापौर सुरेखा कदम, विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मातब्बरांच्या जय्यत तयारीमुळे निवडणुकीत चुरस वाढली आहे.

विविध 6 नगरपरिषदा/ नगरपंचायतींसाठी आज मतमोजणी

राज्यातील विविध सहा नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या अध्यक्ष आणि सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी सरासरी 74.12 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. सहापैकी मौदा आणि शेंदुर्णी या दोन नगरपंचायती आहेत. उर्वरित सर्व नगरपरिषदा आहेत. आज सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशी माहिती सहारियांनी दिली.

या नगरपरिषद/नगरपंचायत निहाय सरासरी मतदान

नेर- नबाबपूर (जि. यवतमाळ)- 73.15, लोहा (नांदेड)- 86.75, मौदा (नागपूर)- 77.56, रिसोड (वाशीम)- 68.07, ब्रम्हपुरी (चंद्रपूर)- 70.52, आणि शेंदुर्णी (जळगाव)- 74.19, एकूण सरासरी- 74.12.

मराठा आरक्षणाच्या याचिकेवर सुनावणी

राज्य सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण जाहीर करत कायदा केला. परंतु, या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. राज्य सरकारने 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण जाहीर करणं हे राज्यघटनेविरोधात आहे, अशी भूमिका घेत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या वतीनं ही याचिका सादर करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

कोल्हापूरचे महापौर कोण?

कोल्हापूर महापालिकेत महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात सध्या कलगीतुरा रंगला आहे. हे दोन्ही नेते एकमेकांवर आरोप करत असून येत्या सोमवारच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार याकडे संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलं आहे. कोल्हापूर महापालिकेवर दोन्ही काँग्रेसची सत्ता आहे आणि दर सहा महिन्यांनी महापौर आणि उपमहापौर पदाची संधी नगरसेवकांना दिली जाते, मात्र जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्यानं 5 नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे. त्यावरून चंद्रकांत पाटील सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांनी केलाय तर दुसरीकडे कायदा सुव्यवस्था बिघडली तर माझा संबंध नाही मुश्रीफ यांचा संबंध आहे असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला. त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून या सगळ्या निवडणुकीत घोडेबाजार होण्याचीही दाट शक्यता आहे.

बारामती,इंदापूरमध्ये रिपाइंने पुकारला बंद

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर अंबरनाथमध्ये हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याच्या निषेधार्थ बारामती आणि इंदापूरमध्ये रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी बंद पुकारला आहे. शनिवारी अंबरनाथमध्ये प्रवीण गोसावी नावाच्या तरुणाने आठवले यांच्यावर हल्ला केला. या तरुणाला रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी बेदम चोप देऊन पोलिसांच्या हवाली केलं. रविवारी अंबरनाथसह ठाण्यात ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला होता.

============================================

First published: December 10, 2018, 6:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading