पुणे, 22 फेब्रुवारी : कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भूमात ब्रिगेडच्या कार्यकर्त्या तृप्ती देसाई आक्रमक झाल्या होत्या. निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात पीसीपीएनडीटी कायद्यानुसार कारवाई झाली नाही तर आपण इंदोरीकर यांच्या अकोल्यात जाऊन त्यांना काळे फासू असा इशारा दिला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा गदारोळ झाला आहे. तृप्ती देसाई यांना अनेक धमक्यांचे फोन येत आहेत. अकोल्यातील सोमनाथ महाराज भोर यांनी फोन करुन धमकी दिली आहे, अशी माहिती तृप्ती देसाई यांनी दिली आहे. याबाबत तृप्ती देसाई यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे ईमेलद्वारे तक्रार दाखल केली आहे. २१ फेब्रुवारी सकाळी पुण्यातील धनकवडी येथे राहत्या घरी सोमनाथ महाराज भोर यांचा फोन आल्याचे तृप्ती देसाईंनी सांगितले. सोमनाथ महाराजांनी अश्लिल शिवीगाळ केली. तू जर इंदुरीकर महाराजांच्या विरोधातील तक्रार मागे घेतली नाही तर तू अकोल्यात ये, तुला कापूनच टाकतो. तू कुत्री आहेस, नालायक आहेस असे म्हणून तुझी पैदास कुठली आहे... तू एका बापाची पैदास नाहीस.. तू महिला नाही तर हिजडा आहेस. अशी अश्लिल कमेंट करीत शिवीगाळ केल्याचे देसाईंनी सांगितले. ‘मला कापून टाकण्याची भाषा हे महाराज करीत असल्यामुळे माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या जीविताला पुन्हा एकदा इंदोरीकर आणि त्यांच्या समर्थकांकडून धोका निर्माण झालेला आहे. यासंदर्भात पुण्यातील सहकारनगर पोलीस स्टेशन येथे मेलद्वारे काल मी तक्रार दाखल केली आहे’ असे तृप्ती देसाईंनी सांगितले. अद्याप या प्रकरणावर अकोल्याचे सोमनाथ भोर महाराजांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यांची प्रतिक्रिया आल्यानंतर त्याचाही बातमीत समावेश केला जाईल.
नेमकं इंदोरीकर महाराज काय बोलले ?
'स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माल आला.' असं इंदोरीकर महाराज आपल्या कीर्तनादरम्यान म्हटले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: #Pune, Activist Trupti Desai