संदीप राजगोळकर, प्रतिनिधीबेळगाव, 26 डिसेंबर : सध्या सोशल मीडियामध्ये टिक टॉक भन्नाट फेमस आहे. तरुणाईमध्ये तर टिक टॉक म्हणजे जिव्हाळ्याचा विषय असतो. पण याच टिक टॉकच्या व्हिडिओमुळे बेळगाव जिल्ह्यातल्या एका युवकाला जेलची हवा खावी लागली आहे.
कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर येथील अमन आवटे या तरुणानं टिक टॉकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल व्हिडिओ तयार केले होते. या व्हिडिओमुळे अमनला जेलची हवा खायला लागली आहे.
टिकटॉकचा वापर करून राष्ट्रीय नेत्यांबद्दल अपमानास्पद विधान केल्याची तक्रार त्याच्याविरोधात संकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली होती.
अमन आवटे याने स्पेशल इफेक्ट देऊन मोदी शहा यांच्या बाबतचे जे व्हिडिओ तयार केले होते. ते सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हिंदुत्ववादी संघटनांनी यावर आक्षेप घेत त्याच्या विरोधात तक्रार दिली होती.
त्यानंतर संकेश्वर पोलीस ठाण्याचे पीएसआय गणपती कोगनोळी यांनी अमन आवटे याला अटक केली. सध्या त्याची रवानगी बेळगावमधल्या हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असताना सामाजिक भान नक्कीच राखले पाहिजेत त्यातच राजकीय, धार्मिक पोस्ट करताना प्रत्येकाने काळजी घेतलीच पाहिजेत नाहीतर अमन प्रमाणे जेलची हवा खायला मिळणार हे मात्र नक्की.
दरम्यान, मुंबईतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एका तरुणाने फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला शिवसैनिकांनी मारहाण करून मुंडन केलं होतं. या प्रकरणी 5 जणांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर हिरामणी तिवारी नावाच्या या व्यक्तीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर संतापलेल्या शिवसैनिकांनी तिवारी यांना भर चौकात त्याचे टक्कल करून बेदम मारहाण केली होती.
मारहाणीमुळे या व्यक्तीच्या कानाच्या पडद्याला दुखापत झाली. शिवसैनिकांवर कारवाई व्हावी, अशी मागणी तिवारी याने केली होती. दरम्यान, हिरामणी तिवारी हे बजरंग दल या संस्थेशी संबंधित आहे. तसेच ते विश्व हिंदू परिषदेसाठी काम करत असल्याची माहितीही समोर आली. अखेर या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.