चंद्रपूर, 05 मार्च: महाराष्ट्रातील चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जंगल क्षेत्र (Forest Area) आहे. या भागात अस्वल, बिबट्या, वाघ किंवा लांडगा यांसारखे हिंस्त्र प्राणी आहेत. दरम्यान या भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये गावालगतच्या तलावावर बैलांना पाणी पाजण्यासाठी घेऊन गेलेल्या एका शेतकऱ्यांवर वाघाने प्राणघातक हल्ला (tiger attack on farmer) केला आहे. या हल्ल्यात संबंधित शेतकऱ्याचा जागीच मृत्यू (farmer death in tiger attack) झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मृत शेतकऱ्याचं नाव पुरुषोत्तम मडावी असून ते चंद्रपूर जिल्ह्यातील चेक आष्टा येथील रहिवाशी आहेत. 52 वर्षीय शेतकरी पुरुषोत्तम मडावी गुरुवारी सायंकाळी आपल्या बैलांना पाणी पाजण्यासाठी गावालगतच्या एका तलावाकडे गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत आणखी तीन इतर शेतकरी देखील होते. इतर तीघे काही वेळानंतर घरी परतले, मात्र पुरुषोत्तम मडावी रात्री उशीरापर्यंत घरी पोहचले नाहीत.
त्यामुळे कुटुंबीयांनी तलावाच्या परिसरात आणि गावात शोधाशोध सुरू केली. त्यानंतर मडावी बेपत्ता असल्याची बातमी सर्व गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर गावकऱ्यांनी मडावी यांना शोधण्यासाठी तलाव परिसर पालथा घातला. तसेच जवळच्या जंगलातही शोधाशोध केली, पण पुरुषोत्तम मडावी हे काही सापडले नाहीत. त्यामुळे रात्री उशीरा शोध मोहिम बंद केली. त्यानंतर आज सकाळी काही गावातील काही लोकांनी पुन्हा मडावी यांना शोधण्यास सुरुवात केली.
हे वाचा- आयुष्यभराची पुंजी काही मिनिटांत राख; हिंगणघाटमधील दुर्घटनेमुळे शेतकरी हादरला
शुक्रवारी सकाळी (05 मार्च) गावकऱ्यांनी काही वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने जंगल क्षेत्रात शोध मोहिम राबवली. यावेळी चिंतलधाबा बिटातील कक्ष क्रमांक 96 राखीव जंगलात पुरुषोत्तम मडावी यांचा मृतदेह आढळून आला. यावेळी त्यांच्या शरिरावर अनेक जखमा होत्या. यावरून त्यांच्यावर वाघाने प्राणघातक हल्ला केल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गोंडपिपरी याठिकाणी पाठवण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.