Home /News /maharashtra /

वाघाच्या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी.. थरारक Video आला समोर

वाघाच्या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी.. थरारक Video आला समोर

भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील बिनाखी गावात एका वाघाच्या हल्लात 3 जण जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    प्रवीण तांडेकर(प्रतिनिधी) भंडारा, 25 जानेवारी- भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील बिनाखी गावात एका वाघाच्या हल्लात 3 जण जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत वाघ एका व्यक्तीच्या अंगावर बसलेला दिसत आहे. दरम्यान, इतर गावकऱ्यांनी वाघाला पळून लावल्यामुळे व्यक्तीचा जीव थोडक्यात बचावला. या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे. बिनाखी वाघाची दहशत मागील काही दिवसापासून सुरू असून वनविभागाच्या पथकाने वाघाला पळवून लावले होते. मात्र, शनिवारी पुन्हा वाघाचे दर्शन झाल्याने मोठी दहशत निर्माण झाली. नागरिकांनी मोठी गर्दी केली असताना वाघाने जमावावर हल्ला केला. गावकऱ्यांनी वाघाला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. छोटेलाल ठाकरे (रा. गोंदेखारी), शंकरलाल तुरकर (रा. मिरगपूर, मध्यप्रदेश) आणि विजय शहारे (रा. शिंदपुरी) अशी जखमींची नावे आहेत. वनविभागाची टीम घटनास्थळावर पोहोचली असून वाघ जंगलाच्या दिशेने पळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुमसर वनपरिक्षेत्रातील बिनाखी परिसरात मागील काही दिवसांपासून वाघाने दहशत पसरवली आहे. मागील आठवड्यात गोंदेखारीत एक व्यक्ती जखमी झाल्याची घटना घडली होती. या वाघाला वनविभागाच्या पथकाने जंगलात पळवून लावले होते. मात्र, शनिवारला सकाळी हा वाघ पुन्हा बिनाखी परिसरात नागरिकांना दिसला. याची कल्पना वन विभागाला देऊन नागरिकांनी वाघाला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Bhandara, Latest news, Tiger attack, Vidarbha

    पुढील बातम्या