बालाजी निरफळ, उस्मानाबाद, २० एप्रिल- नळदुर्ग येथील भुईकोट किल्ल्यात बोरी नदीत बोटिंग करताना बोट उलटून 3 लहान मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी ही घटना घडली. मुले सेल्फी घेत असताना ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये 7 ते 8 वयोगटातील दोन मुली व एका मुलाचा समावेश आहे.
मृत मुले पुरातत्व खात्याशी करार करून किल्ला देखभाल करणाऱ्या युनिटी मल्टिकॉन्स कंपनीचे मुख्य संचालक कफील मौलवी यांचे नातेवाईक असल्याचे सांगितले जात आहे. सानिया फारुक काझी (9), ईझान एहसान काझी (7), अलमास शफीक जहागिरदार (10) सर्व रा. नळदुर्ग असे पाण्यात बुडालेले नावे आहेत.
शनिवार रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नळदुर्ग येथील किल्ल्याजवळच असलेल्या काझी गल्लीतून आठ ते दहा मुले-मुली किल्ला पाहण्यासाठी आले होते. हे सर्व युनिटी कंपनीचे संचालक कफील मौलवी यांचे नातेवाईक असल्याने तिकीट काढण्याचा प्रश्न नाही. या मुलांनी किल्ल्यातील प्रेक्षणीय स्थळे पाहिल्यानंतर आठजण बोटमध्ये बसले. बोट सुरु होवून बोरी नदीच्या काठाकडे जात असताना एका मुलाने सेल्फी घेण्यासाठी जागेवरुन उठून पुढे गेला. त्यापाठोपाठ काही मुले पुढे आल्याने बोटचा तोल जात असल्याने गोंधळ उडाला. यातच वरील तिघे बोरी नदीच्या पात्रात बुडाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
घटनेनंतर सानिया या मुलीस पाण्याबाहेर तातडीने बाहेर काढून उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल करण्यात आले. मात्र, सानियाचे उपचारापूर्वी निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर तीन ते चार तासानंतर अलमास हिचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले. तर ईझान हिचे मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे.