महाड, 24 ऑगस्ट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर महाड न्यायदंडाधिकाऱ्यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे. 15 हजार जातमुचलक्यांवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसंच, नारायण राणे यांनी भविष्यात पुन्हा असे वक्तव्य करणार नाही, अशी ग्वाही देण्यात आली आहे. (narayan rane bail granted)
नारायण राणे यांना दुपारी अटक केल्यानंतर त्यांना महाडमध्ये आणण्यात आले. त्यानंतर महाड न्यायदंडाधिकारी बाबासाहेब पाटील यांच्यासमोर सुनावणी पार पडली. राणे यांचं वय आणि प्रकृती पाहता महाड पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्या प्रकरणी जामीन मंजूर करण्यात आला आहे. 15 हजार जातमुचलक्यांवर जामीन दिला आहे.
#UPDATE | Mahad Magistrate Court has granted bail to Union Minister Narayan Rane on furnishing a personal bond of Rs 15,000 in connection with his alleged statement against Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray pic.twitter.com/OlwbVlQc3Y
— ANI (@ANI) August 24, 2021
तसंच, महिन्यातून दोन वेळा पोलीस स्टेशनमध्ये दाखल होण्याचे आदेश कोर्टाने नारायण राणे यांना दिले आहे. त्याचबरोबर, भविष्यात यापुढे असे वादग्रस्त विधान करणार नाही, अशी ग्वाही खुद्द नारायण राणे यांनी कोर्टात दिली आहे. त्यावर हा जामीन मंजूर झाला आहे.
मात्र, दुसरीकडे नाशिकमध्ये नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. त्यामुळे राणे यांना जामीन जरी मिळाला असला तरी नाशिक पोलीस ताबा मागण्याची शक्यता होती. मात्र गृह विभागाच्या आदेशाकडून कोणताही निर्णय देण्यात आला नाही. त्यामुळे नाशिक पोलिसांकडून अटकेची कारवाई टळली आहे.
गोळ्या घेण्यासाठी नितेश राणेंची धावाधाव, राणेंची पत्नीही हजर; काय घडलं कोर्टात?
पोलिसांनी राणे यांची सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. परंतु, नारायण राणे यांचे वकिलां युक्तिवाद केला. नारायण राणे यांचं वय आणि प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना जामीन द्यावा, अशी मागणी करण्यात आली. तसंच राणेंना मधुमेह, उच्चरक्तदाबाचा त्रास आहे, यावर त्यांची औषध सुरू आहे, अशी माहिती देण्यात आली. तसंच, नारायण राणे यांना अटक करण्यापूर्वी कोणतीही नोटीस देण्यात आली नसल्याचे राणेंच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं. अखेर दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर नारायण राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला.
कोर्टातील युक्तीवाद
- भीषण साळवी, वकील, सरकारी पक्ष : नारायण राणे यांच्या विरोधात चार FIR दाखल आहेत. महाड, पुणे, नाशिक, ठाणे.
- कलम ५०० मानहानी
- कलम ५०५(२) गैरप्रकारांकडे नेणारी विधाने
- कलम १५३ अ सामाजिक तेढ निर्माण करणे
- पुढील चौकशी करता ७ दिवसांची पोलिस कोठडी द्यावी
- मुख्यमंत्री पदाची गरीमा राखली नाही
नारायण राणे यांच्या वकिलांचा युक्तीवाद
- दाखल गुन्ह्यांत ७ वर्षांपेक्षा जास्त शिक्षा नाही
- दाखल केलेले गुन्हे आणि अटक राजकीय द्वेषापोटी
- ७ दिवसांची कोठडी मागणे बेकायदेशीर
- नारायण राणे यांचे वय ६९
- त्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास आहे
- कलम ४१(अ) मध्ये नोटीस बजावली नाही
- कलम ५०० नुसार दाखल केलेला गुन्हा पिडीताने ( मुख्यमंत्र्यांनी) दाखल केला नसून तो अज्ञाताने दाखल केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.