जालना, 27 सप्टेंबर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी, 'अशा राजकीय भेटीगाठी होत असतात, सेनेसोबत आमचे राजकीय मतभेद असतील पण वैमन्यस्य असे काही नाही', असं सूचक विधान केले आहे.
न्यूज 18लोकमतशी बोलत असताना रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्याबद्दल कोणतीही हालचाल सुरू नसल्याचा दावा केला आहे.
'महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा कोणताही खटाटोप आमचा सुरू नाही. आम्ही सक्षम विरोधी पक्ष नेता म्हणून काम करत आहोत. अशा राजकीय भेटीगाठी होत असतात. आमचे काही राजकीय मतभेद असतील, तरी आमच्यामध्ये काही राजकीय वैमनस्य नाही', असं सूचक विधानही दानवेंनी केले.
एकमेकांच्याच पायात-पाय अडकून सरकार पडल्यास भाजपला दोष देऊ नका - रावसाहेब दानवे pic.twitter.com/F5oI12Js6w
— News18Lokmat (@News18lokmat) September 27, 2020
'दोन-तीन दिवसांपूर्वी संजय राऊत यांची दिल्लीमध्ये भेट झाली होती. मी आणि संजय राऊत हे एकमेकांच्या शेजारी राहतो. त्यांनी चहा पिण्यासाठी निमंत्रण दिले आणि आम्ही दोघांनी सोबत चहा घेतला होता. अशीच काल दोन राजकीय नेत्यांची भेट झाली. या भेटीमध्ये एकत्र बसता, चर्चा करता. पण, अशा भेटीतून फार राजकीय चर्चा होत नसते, असंही रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.
तसंच, ' महाविकास आघाडी सरकार पडावे, असा कोणताही प्रयत्न भाजप करत नाही. पण, जर एकमेकांच्या पायात पाय पाडून जर सरकार पडत असेल तर त्याला भाजपला दोष देऊ नका, आम्ही सक्षम विरोध पक्षनेता म्हणून काम करत आहोत. आम्ही असा कोणताही खटाटोप करत नाही, असंही दानवे यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, संजय राऊत यांनीही फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर सूचक विधान केले होते. 'देवेंद्र फडणवीस यांची भेट ही गुप्तपणे मुळीच नव्हती. 'सामना'च्या मुलाखतीसाठी त्यांची भेट घेतली होती. गप्पा मारल्या आणि एकत्र जेवण केले. मुळात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत कुणीही कुणाचे शत्रू नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे काही आमचे कायमचे शत्रू नाही. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहे. उद्धव ठाकरे हे सुद्धा त्यांना आपला नेता मानतात आणि मी सुद्धा मानतो', असंही राऊत यांनी सांगितलं.