बीड, 4 मे- चैत्र महिन्यात नवस फेडण्यासाठी देवीच्या मंदिरातील दानपेटीत टाकलेले दागिने आणि पैशावर जिल्हा परिषद सदस्यानेच डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी भाजपचा नेता आहे.
केज तालुक्यातील देवगाव येथे पुरातन रेणुका माता मंदिर आहे. चैत्र महिन्यात या मंदिरात यात्रा भरते. या यात्रेत लाखो लोक सहभागी होतात. तसेच नवसाला पावणारी देवी म्हणून अनेक जण श्रध्देने नवस फेडतात. सोने, चांदी आणि रोख रक्कम दान म्हणून टाकतात. यात्रा झाल्यावर ही दानपेटी सर्व गावकऱ्यांच्या समोर उघडली जाते. दानात आलेली रक्कम मंदिर विकास, गावच्या विकास कामात खर्च केली जाते. पण या वर्षी या भागातील जिल्हा परिषद सदस्यानी गावकऱ्यांना न विचारता परस्पर दानपेटीमधील रक्कम हडप केल्याची तक्रार देवगावच्या गावकऱ्यांनी केज पोलिसांत केली. या तक्रारीमध्ये भाजपचे जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे यांच्यासह इतर तीन लोकांनी पुजाऱ्याला धमकी देत दानपेटी परस्पर उघडून रक्कम आणि दागिने लांबवल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तसेच जिल्हापरिषद सदस्याच्या राजकीय दबावापोटी पोलीस सहकार्य करत नसल्याची तक्रार देखील गावकरी करत आहेत. यात मंदिर उत्सव समिती यांना विश्वात घेतले नाही, असे उत्सव समितीचे सदस्य बंडू मुंडे, चंदर मुरकुटे, तात्यासाहेब मुंडे यांनी सांगितले.
मंदिरच्या पुजाऱ्याला विचारले असता आमच्याकडे चावीची मागणी केली. तेव्हा मी चावी दिली होती. पुन्हा माहीत नाही काय केले ते. मात्र, पुजाऱ्याने कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला. जिल्हापरिषद सदस्याची गावात दहशत असल्याने धमकी दिल्याचे गावकरी सांगत आहेत. या प्रकरणात पोलीस देखील हेतू परस्पर सहकार्य करत नाहीत, असे गावकरी म्हणत आहेत.
चैत्र महिन्यातील देवगाव गावांतील रेणुका मातेची यात्रा असते या यात्रेतील दान पेटी गावासमोर न उघडता परस्पर उघडी असल्याची तक्रार आमच्याकडे दाखल आहे..या बाबतीत अधिक तपास सुरु आहे. या तक्रारीत विजयकांत मुंडे यांच्यासह इतर तीन लोकांची नावे आहेत, असे केजचे पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांनी सांगितले. तसेच दोषीवर योग्य ती कारवाई केली जाईल असे पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांनी सांगितले.
मंदिरातील दानपेटीवर डोळा ठेवणारे आणि दानपेटीमधील सोने-चांदी आणि पैशावर डल्ला मारणाऱ्या या घटनेची जिल्ह्यात चांगलीच चर्चा होत आहे. रेणुका माता मंदिरातील नवसाच्या रकमेवर डल्ला मारणारे कोण याचा पोलीस तपास करत आहेत. मात्र, सध्या तरी दुष्काळात दानपेटीवर डल्ला मारल्याची घटना चर्चेचा विषय ठरली आहे..