मुंबई, 18 जानेवारी : ठाण्यात एक मोठी आणि विचित्र घटना घडली आहे. ठाण्यातील शिवाईनगर येथे वारीमाता गोल्ड ज्वेलर्स दुकानावर एका फळविक्रेत्याने भितींना भगदाड पाडून ज्वेलर्समधील सर्व दागिन्यांवर हात साफ केला आहे. वारीमाता गोल्ड नावाच्या ज्वेलर्सच्या दुकानात शनिवारी रात्री 2 ते 2:30 च्या सुमारास घरफोडी झाली. त्यामध्ये अंदाजे 3 किलोपर्यंत सोने चोरीला गेल्याची माहिती आहे.
या घटनेत चोराने मोठ्या कल्पकतेने ही चोरी केल्याचं समोर आलं आहे. परराज्यातील एका व्यक्तीने या ज्वेलर्सच्या दुकानाच्या बाजूचे दुकान दोनच महिन्यापूर्वी भाड्याने घेतले. 28 हजार रुपये भाडे मिळते म्हणून पाटील नावाच्या दुकान मालकाने काहीही चौकशी न करता अनोळखी माणसाला आपले दुकान भाड्याने दिले. आपला फळांचा व्यवसाय असून त्या करता हा गाळा हवा आहे, असं आरोपीने त्यांना सांगितले होतं.
दोन महिने दिखाव्यासाठी त्याने फळ विकण्याचा बनाव केला आणि शनिवारी रात्री दोन्ही दुकानामधील भिंतीला छोटेसे भगदाड पाडून आत प्रवेश केला व सर्व सोन्याचे दागिने चोरून नेले. या घटनेमुळे ठाण्यातील ज्वेलर्स दुकानांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
कुठेही भाडेकरु ठेवताना त्याची संपूर्ण माहिती ही स्थानिक पोलीस स्टेशनला द्यावी जेणेकरुन भविष्यात भाडेकरुने काही गुन्हा केला तर त्याचा शोध घेण्यास पोलिसांना सोपे जाईल आणि घडलेल्या गुन्ह्याची उकल होईल, असं आवाहन पोलिसांकडून वारंवार केलं जातं. पण असं असतानाही पैशांच्या हव्यासा पोटी लोकं भाडेकरुची कोणतीही माहिती न देता भाड्याने दुकान देतात आणि मग दरोडा पडला किंवा भाडेकरुने कोणताही गुन्हा केला की पोलिसांना दोष देत बसतात.
शिवाई नगर येथील घटनेत हेच घडले असून दुकान मालकाने पोलिसांना भाडेकरुबद्दल कोणतीच माहिती दिली नव्हती. त्यामुळे आता दरोडेखोरांना शोधण्यात पोलिसांना अडचणी निर्माण होण्याची शक्य आहे. आता या प्रकरणी गाळा मालकावर देखील पोलीस कारवाई करणार आहेत. जेणेकरून परत असं कोणी पुन्हा करणार नाही. दरम्यान, या प्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.