बेळगाव 9 नोव्हेंबर: फसवणारा कधी कोणास कसा फसवेल हे काही सांगता येणार नाही. आपण लष्कारात अधिकारी (Army officer ) असल्याचं खोटं सांगून एका तरुणाने तब्बल 5 लग्न केले. एवढच नाही तर तो वीर पत्नींना निवृत्ती वेतन मिळवून देतो असं सांगून पैसेही उकळत असल्याचं पुढे आलं आहे. मंजुनाथ बिराजदार असं त्या भामट्याचं नाव आहे. मराठा लाईट इन्फंट्रीच्या परिसारत संशयास्पद फिरताना त्याला अटक करण्यात आली होती त्यानंतर त्याचं बिंग फुटलं आणि धक्कादायक माहिती कळली.
मंजुनाथने लष्करी अधिकाऱ्यासारखा दिसणारा ड्रेस शिवून घेतला होता. हा ड्रेस घालून तो गावामध्ये जात असे आणि लोकांशी गोड बोलून ओळख करून घेत असे. मी लष्कारात आहे. सुट्टीत गावी आलोय. मला कुणीही नाही असं खोटं सांगून तो सहानुभूती निर्माण करत असे.
आधीच लोकांच्या मनात लष्कराविषयी प्रेम आणि सहानुभूती असते. त्याचा फायदा घेऊ हा गरजू असल्याचं भासवत होता. अद्याप लग्न झालेलं नसून लग्न करायचं आहे असं सांगत तो मुलींच्या कुटुंबीयांना फसवत असे.
लग्न करून पैसे उकळायचे आणि काही दिवसात पत्नीला माहेरी पाठवायचं आणि फरार व्हायचं असे उद्योग तो करत असल्याचं पोलिसांना आढळून आलंय. अशाच पद्धतीने त्याने तब्बल 5 तरुणींना फसवलं आहे. आता काही तरुणींचे पालक पुढे येत असून त्यांनी तक्रारही दाखल केल्या आहेत.
पिंपरीत पोलीस ठाण्याच्या आवारातच वाहनांना अचानक लागली आग, परिसरात भीतीचं वातावरण
मंजुनाथ हा शहीद जवानांच्या पत्नींना भेटून तुम्हाला पेंशन मिळवून देतो असं खोटं सांगून पैसे उकळत असे. अशा अनेकांकडून त्याने पैसे घेतल्याचंही उघड झालं आहे.
मंजुनाथने आणखी कुणा कुणाला फसवलं याची चौकसी आता पोलीस करत आहेत. त्याचा आणखी कुठला उद्देश आहे का याचीही माहिती पोलीस घेत आहे. लष्करी भागात तो संशयास्पदरित्या फिरत असल्याने पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून कसून चौकशी करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.