नागपूर, 13 जून- मुंबईच्या एका पोलिस खबऱ्याने लग्न करण्यासाठी स्वत:ला 'रॉ'चा ( रिसर्च अॅण्ड अॅनालिसिस विंग-दहशतवाद रोखणारी व गुप्त ऑपरेश करणारी संस्था) एजंट असल्याचं सांगून एका महिलेची फसवणूक केली आहे. इमरान खान नूर मोहम्मद खान असे मुंबईतील गोवंडी येथे राहणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
इमरान हा मुंबई पोलिसांचा खबऱ्या म्हणून काम करतो. त्यामुळे त्याला पोलीस आणि गुन्हेगारी जगताची माहिती आहे. तो घटस्फोटित आहे. दोन महिन्यापूर्वी त्याची गिट्टीखदान परिसरातील एका 35 वर्षीय महिलेसोबत ओळख झाली. महिलेचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे. तीसुद्धा घटस्फोटित असून, ती लग्न करण्यासाठी चांगल्या मुलाच्या शोधात होती. दोन महिन्यांपूर्वी तिची आणि इमरानसोबत फेसबुकवर मैत्री झाली. इमरानने स्वत:ची ओळख 'रॉ' एजंट म्हणून दिली.
पाकिस्तानमध्ये आपले येणे-जाणे असल्याने त्याने सीमेपलीकडे अनेक ऑपरेशन केल्याचेही तिला सांगितले. त्याच्या बोलण्याने ती प्रभावित झाली. इमरानने तिला लग्नाची मागणी घातली. महिलेनेही ती स्वीकारली. तो तिला भेटण्यासाठी 15 दिवसांपूर्वी नागपुरात आला. महिलेने आपल्या कुटुंबीयांना त्याच्याबद्दल सांगितले. लग्न करणार असल्याने तो तिच्या घरीच कुटुंबीयांसोबत तो राहू लागला. दरम्यान, दीड कोटी रुपयांत बंगला खरेदी करण्याची तयारी त्याने दर्शविली. यादरम्यान 15 दिवसांत वेगवेगळी कारणे सांगून त्याने महिलेकडून 30 हजार रुपये घेतले. त्याच्या एकूणच व्यवहारावरून महिलेला संशय आला. तिने मंगळवारी इमरानच्या आई-वडिलांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु आई-वडिलांचा मृत्यू झाल्याचे त्याने सांगितले. घरी त्याच्याशिवाय दुसरा कुणीही नाही, असेही सांगितले. यानंतर महिलेने त्याला 'रॉ'चे ओळखपत्र दाखविण्यास सांगितले. यावर तो कुठलेही समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. यामुळे तिचा संशय आणखीनच वाढला. महिलेन गिट्टीखदान पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आणि पोलिसांनी आरोपीला अटक केली. पुढील तपा पोलीस निरीक्षक सतिष गुरव करीत आहेत.
औरंगाबाद मनपामध्ये गोंधळ, एमआयएम-शिवसेना आमनेसामने