चार तरुणांसोबत लग्न करून तरुणीने घातला लाखोंचा गंडा

चार तरुणांसोबत लग्न करून तरुणीने घातला लाखोंचा गंडा

एक नाही, दोन नाही तर तब्बल चार तरुणांशी लग्न करून तरुणी आणि तिच्या आईवडीलांनी सर्वांना लाखोंचा गंडा घातला.

  • Share this:

बब्बू शेख, मनमाड, 23 जून : पुरुषाने एका पेक्षा जास्त लग्न केल्याच्या अनेक घटना वेळोवेळी समोर आल्या आहेत, मात्र एका तरुणीने घटस्फोट न घेताच एक नव्हे दोन नव्हे तर चक्क चार लग्न करून चार तरुणांची फसवणूक केली असं म्हटलं तर त्याच्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र असा प्रकार मनमाड शहरात घडला. एका 22 वर्षीय तरुणीने पैशाच्या लालसेपोटी वेगवेगळ्या भागातील 4 तरूणा सोबत लग्न करून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार मनमाडच्या तरुणाने उघडकीस आणला.

या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसांनी या तरुणीसह तिचे आई वडील आणि लग्न जुळवून देणारी एक महिला व पुरुष अशा 5 जणांना अटक करून त्यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. या टोळीने आणखी  किती तरुणांची फसवणूक केली याचा तपास पोलीस करीत आहे.

अशी झाली फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मनमाडच्या संभाजी नगर भागात राहणारे अशोक डोंगरे यांचा मुलगा  जयेश याच्यासाठी मुलगी बघण्याचा कार्यक्रम सुरू असताना त्यांची ओळख पुजा भागवत गुळे (रा.अहमदपूर जि.लातूर) या महिलेशी झाली तिने लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे राहणारे माझे ओळखीचे बंडू बेंद्रे असून त्यांची मुलगी ज्योती लग्नाची आहे. मुलगी शिकलेली आणि सुंदर आहे मात्र बेंद्रे कुटुंबीय गरीब असल्याने त्यांच्याकडे  लग्न करण्यासाठी पैसे नाही सर्व खर्च तुम्हाला करावा लागेल शिवाय त्यांची मदत करण्यासाठी त्यांना पैसे द्यावे लागेल असं सांगितलं. त्यानंतर डोंगरे दांपत्य मुलगा जयेशला सोबत घेवून अहमदपूरला गेले त्यांना मुलगी पसंत पडल्यानंतर जयेश व ज्योतीचा 12 मे रोजी लग्न सोहळा पार पडला.

सर्व कुटुंबच सहभागी

लग्नाच्याआधी अगोदर डोंगरे यांनी ज्योतीच्या आई-वडिलांना 40 हजार रुपये रोख  दिले आणि सुनेच्या अंगावर 50 हजार रुपयांचे दागिनेही घातले. ज्योती काही दिवस येथे राहिल्यानंतर माहेरी गेली आणि परत आलीच नाही. वारंवार प्रयत्न करून देखील ज्योती येत नसल्याचे पाहून डोंगरेंना संशय आला आणि त्यांनी तपास केला असता ज्योतीचे या अगोदर देखील 3 लग्न झाले असून चौथे लग्न तिने त्यांच्या मुलासोबत केल्याचं स्पष्ट झालं. एवढच नाही तर  पाचवं लग्न करण्याच्या तयारीत असल्याचे कळताच त्यांना मोठा धक्का बसला.

आपली व आपल्या मुलाचीच नव्हे तर या टोळीने इतरांची देखील फसवणूक करून त्यांना लुबाडल्याचे समोर आले अखेर अशोक डोंगरे यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेवून फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी  ज्योती सोबत  तिची आई विमल बेंद्रे वडील बंडू केंद्रे त्याची लग्न लावून देणारे पूजा भागवत गुळे व विठ्ठल पांडुरंग मुंडे यांच्याविरुद्ध कलम 420, 494, 495 यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला.

अखेर पडल्या बेड्या

हा सर्व प्रकार  पोलिसांपर्यंत गेल्याचं कळताच आपले बिंग फुटेल म्हणून सर्वजण तडजोड करण्यासाठी मनमाडला डोंगरे यांच्याकडे आले मात्र त्यांनी पोलिसांना याची माहिती देताच पोलिसांनी सापळा रचुन सर्वाना शिताफीने अटक केली. सर्व आरोपींना न्यायलयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली असून इतर सर्व प्रकरणांचाही तपास पोलीस करत आहेत.

First published: June 23, 2019, 10:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading