नाशिक, 18 मार्च : रस्ता ओलांडत असताना भरधाव एसटी बसने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
नाशिकमधील मुंबई -आग्रा मुंबई आग्रा महामार्गावरील शिरवाडे वणी फाट्यावर मंगळवारी सकाळी ही घटना घडली आहे. एक दुचाकीस्वार रस्ता ओलांडत होता. त्याचवेळी आलेल्या भरधाव एसटी बसने दुचाकीस्वाराला जोराची धडक दिली. बसची धडक बसल्यामुळे दुचाकीस्वार काही अंतर दूर फेकला गेला. बसचालकाने अचानक ब्रेक लावले असता दुचाकी चाकाखाली सापडली.
दरम्यान, नागपुरात एका ट्रकचालकाला मारहाण करणे दोन तरुणांना चांगलेच महागात पडले. या ट्रकचालकाचं रौद्ररूप भर रस्त्यात वेगळ्याच स्वरुपात पाहायला मिळालं.
एक ट्रकचालक 12 मार्चच्या रात्री कंट्रोलवाडी परिसरात ट्रकमधील साहित्य गोदामात सोडायला जात होता. गोदामाजवळ पोहोचत असताना एका होंडा स्प्लेंडर आणि अॅक्टिव्हावर जाणारे दोन दुचाकीस्वार समोरून हटत नव्हते. त्यामुळे ट्रक चालकाने वारंवार हॉर्न वाजवला. मात्र, मद्यपान केलेल्या या दोन्ही तरुणांनी ट्रक समोरून काही हटलेच नाही. उलट ट्रक चालकाचे असे हॉर्न वाजवणे आवडले नाही.
त्यामुळे या दुचाकीस्वार दोन्ही तरुणांनी ट्रक थांबवला आणि ट्रकचालकाला बेदम मारहाण केली. या मारहाणातील ट्रकचालक रक्तबंबाळ झाला.
त्यानंतर संतापलेल्या ट्रक चालकाने मारहाण करणाऱ्या दोन्ही दुचाकीस्वारांना धडा शिकवण्यासाठी ट्रकमधून लोखंडी रॉड काढला. चालकाने रॉड हातात घेताच तोवर दोन्ही तरुणांनी आपआपल्या दुचाकी सोडून पळ काढला. त्यानंतर या ट्रक चालकाने लोखंडी रॉडने भररस्त्यात दोन्ही दुचाकींची तोडफोड केली. यात दोन्ही दुचाकींचा अक्षरश: चुराडा झाला.
ट्रकचालकाचा रौद्र अवतार पाहून रस्त्यावरची वाहतूक थांबली, तो का दोन्ही दुचाकी फोडतोय हे लोकांना कळले नाही. मात्र, अनेकांनी ट्रक चालकाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
दोन्ही दुचाकींना फोडल्यानंतर ट्रकचालक ट्रक घेऊन तिथून निघून गेला. नंतर दोन दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी त्याच्या विरोधात गाड्या फोडल्याचा गुन्हा दाखल केला. तर ट्रक चालकाच्या तक्रारीवरून मारहाण करणाऱ्या दोन्ही दुचाकी स्वारांवर मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.