भिवंडी, 06 मार्च : भिवंडी-वाडा रोडवर (Bhiwandi Wada Road) मुलीला घेऊन जात असताना रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात दुचाकीस्वार पडल्याची घटना घडली आहे. या घटनेत मुलीला आणि पित्याला दुखापत झाली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
भिवंडी- वाडा रोडवर शेलार नदीनाका इथं आरसीसी रोडचे आणि नाल्याचे काम सुरू आहे. परंतु, ठेकदाराच्या गलथान कारभारामुळे नाल्याचे खड्डे असताना कोणत्याच प्रकारे नागरिकांच्या सुरक्षाची काळजी घेतली जात नाही. रस्त्याच्या बाजूला खड्डे पडलेले असल्यामुळे बॅरेकेड्स लावले नसल्याने शुक्रवारी दुपारी एक दुचाकीस्वार दुचाकीसह थेट खड्ड्यात पडला.
धक्कादायक म्हणजे, दुचाकीस्वारासोबत दुचाकीवर समोर एक चिमुरडी बसलेली होती. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे दुचारीस्वार रस्त्याच्या बाजूने उतरून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता. नेमकं त्याच वेळी तोल गेल्यामुळे बाजूला असलेल्या खड्ड्यात दुचाकीस्वार पडला. सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, दुचाकी ही चिमुरडीच्या अंगावर पडली.
खड्ड्यात पडल्यानंतर स्थानिक लोकांनी तातडीने धाव घेऊन चिमुरडीला आधी बाहेर काढले त्यानंतर दुचाकीस्वाराला बाहेर काढले. या घटनेत दोघेही जखमी झाले आहे. खड्ड्यातून बाहेर काढल्यानंतर स्थानिकांनी मुलीला आणि दुचाकीस्वाराला नजीक दवाखान्यात नेले. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून बेजबाबदार ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhiwandi, Bike accident, Maharashtra, Mumbai, Road accident, Viral video on social media, भिवंडी