सटाणा, 23 जानेवारी : वाढदिवस साजरा करून दुचाकी वाहनावरून घरी येत असताना ट्रॅक्टरच्या धडकेत आते भाऊ व मामेभाऊ दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नाशिक जिल्ह्यातील सटणा तालुक्यात घडली आहे. दोन्ही भावांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आज पहाटेच्या सुमारास सटाणा - देवळा रस्त्यावरील इंग्लिश मीडियम स्कुल जवळील मॉर्डन कारसमोर ही घटना घडली. विशाल संजय इंगळे (वय 22, राहणार खमताने ता बागलाण) आणि जयेश नितीन अहिरे (वय 19, रा. पिपंळेश्वर रोड, सटाणा) हे दोघे आतेभाऊ व मामेभाऊ युवक जयेश अहिरे यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते.
वाढदिवसाची पार्टी साजरी केल्यानंतर विशाल आणि जयेश दोघे जण आपली होंडा शाईन मोटार सायकल क्रमांक एम एच 41 डी इ 9096 ने सटाणाकडे येत होते. देवळा रस्त्यावरील इंग्लिश मीडियम स्कुल जवळील मॉर्डन कारसमोर पोहोचले असताना अचानक एका ट्रॅक्टरला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यात दुचाकीचा पूर्णपणे चुराडा झाला. जबर मार लागल्यामुळे दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही तरुणांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. दोन्ही कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
नाशिक-पुणे महामार्गावर जीपला अपघात
दरम्यान, नाशिक पुणे महामार्गावर जीपला अपघात झाला आहे. जीप चालकाच नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. संगमनेर तालुक्यातील आंबी फाटा इथं ही घटना घडला. टेम्पोला मागून धडक देऊन जीप दुभाजकावर आदळली. चालकासह जीप मधील पाच जण जखमी झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमींना संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.